छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यातील शिवसंकल्प मेळाव्यानंतर शिवसेनेच्यावतीने (उबाठा) शनिवारी (ता. 10) गडकरी रंगायतन येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. तत्पूर्वी ठाण्यात ठिकठिकाणी ठाकरेंना डिवचणारे बॅनर झळकत आहेत. ठाण्यातील दमानी इस्टेट, तीन हातनाका पेट्रोल पंपाबाहेर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे.
या बॅनरद्वारे उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. ठाण्यात झळकणाऱ्या या बॅनरवर एक व्यंगचित्र पाहायला मिळत आहे. ठाणे लोकसभेत शिवसेना (उबाठा) गटाचे राजन विचारे यांचा पराभव झाला होता. त्यांना शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांनी पराभूत केले. त्या पराभवानंतर प्रथमच उद्धव ठाकरे यांचा पहिला ठाणे दौरा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची आज जाहीर सभा होणार आहे.
या सभेआधी उद्धव ठाकरे यांना डिवचणारे बॅनर्स लावण्यात आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावरुन या बॅनर्समधून टीका करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या या मेळाव्यापूर्वीच ठाणे शहरात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावरुन डिवचणारे बॅनर्स लावण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासमोर लोटांगण घालत असल्याचे व्यंगचित्रांचे मोठे होर्डिंग अनेक ठिकाणी लागले आहेत.
घालीन लोटांगण, वंदिन चरण
बॅनरवर झळकलेल्या या व्यंगचित्रात एका बाजूला शरद पवार, सोनिया गांधी, राहुल गांधी दिसत आहेत. त्याखाली दिल्ली असे लिहिण्यात आले आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे पाहायला मिळत आहे. यात उद्धव ठाकरे हे राहुल गांधींसमोर लोटांगण घालत असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यासोबतच या बॅनरवर ‘घालीन लोटांगण, वंदिन चरण’, असा मजकूर लिहिण्यात आला आहे.
ठाण्यामध्ये राजकीय वातावरण तापले
हे बॅनर्स कोणी लावले, हे समोर आले नाही. पण या बॅनर्समुळे ठाण्यामध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान या बॅनरवरुन राजकीय वाद उफाळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांकडून हे बॅनर्स हटवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच आजच्या ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.