Akola Constituency : 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मात्र, अकोल्यात भाजपच्या कार्यकर्त्यांचा अतिउत्साह पाहायला मिळाला. अकोला मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अनुप धोत्रेंना निकालाआधीच खासदार संबोधून वाढदिवसाच्या शुभेच्छांचे बॅनर शहरात लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जातं आहे.तर, दुसरीकडे या बॅनर वरून वंचित बहुजन आघाडीने आक्षेप घेत कारवाईची मागणी केली आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपकडून खासदार संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रेंना उमेदवारी देण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला अकोला लोकसभा मतदारसंघात मतदान झाले. या मतदारसंघात महायुती, महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात तिहेरी लढत पाहायला मिळाली. महायुतीकडून अनुप संजय धोत्रे तर महाविकास आघाडीकडून डॉ. अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीकडून अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यात खरी लढत झाली. निकालाची सर्वांनाच उत्कंठा आहे.
वाढदिवसाचे बॅनर झळकले
दरम्यान शुक्रवारी, 24 मे रोजी भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांचा वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात अनेक ठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत. यामध्ये भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी अनुप धोत्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना खासदार म्हणून संबोधले आहे. अद्याप निकाल बाकी असून भाजप आणि उमेदवाराकडून अशाप्रकारे आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचा आरोप केला जात आहे.
राजकीय वर्तुळात चर्चा
राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा रंगली आहे. आदर्श आचारसंहिता सुरू असताना सार्वजनिकपणे खासदार म्हणून भाजप उमेदवाराला शुभेच्छा दिल्या जात आहे. बॅनर बाजीतून अनुप धोत्रे यांचा खासदार म्हणून निकालापूर्वीच उल्लेख करण्यात आल्याने यावर वंचित बहुजन आघाडीकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.
Shiv Sena : राज्यपाल पदाच्या खुर्चीआड राणा विरोधाचा ‘गेम’ खल्लास
वंचितने आक्षेप घेत केली कारवाईची मागणी!
भाजपच्या उमेदवाराला कृषी विभागाच्या बैठकीत बोलवले जाते. तक्रार करूनही त्यावर काही कारवाई होत नाही. आता पुन्हा अकोला शहरात त्यांच्या वाढदिवसा निमित्त खासदार म्हणून पोस्टर लागली आहेत. ज्या माणसाने ग्रामपंचायत निवडणूक लढवली नाही त्यांना भावी खासदार कशाच्या आधारावर म्हणत आहेत याचा खुलासा झाला पाहिजे, अशी मागणी वंचितचे प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी केली आहे. निकालाआधीच यांना कुणी सांगितलं की, ते खासदार झाले आहेत.अगदी डोक्यावर पडल्यासारखे प्रकार अकोल्यात सुरू असले तरी गंभीर आहेत असेही राजेंद्र पातोडे म्हणाले. एकतर ईव्हीएम मध्ये घोळ झाला असेल असा आरोप करीत जिल्हा प्रशासनाने खुलासा करावा अशी मागणी वंचितने केली आहे.