Power Play : विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा नागपूरमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. महायुतीच्या सरकारची दुसरी इनिंग सुरू झाली आहे. या टर्ममध्ये पुन्हा एकदा अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार नागपूरमध्ये येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागताचे फलक उभारले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते तथा माझी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासमोरही अजित पवार यांचे बॅनर लागले आहेत.
अजित पवार यांच्या सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांचे फोटो असलेले चौकामध्ये लावण्यात आले आहेत. अजित पवार यांचा बंगला असलेले विजयगड अनिल देशमुख यांच्या घरापासून जवळच आहे. त्यामुळे हे बॅनर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर लावण्यात आले आहेत. परिणामी देशमुख यांच्या घरासमोर राष्ट्रवादीची ‘दादागिरी’ चर्चेचा विषय ठरली आहे.
नेहमीप्रमाणे फलक
नागपूरमध्ये दरवर्षी हिवाळी अधिवेशनदरम्यान सर्वसमंत यांच्या स्वागताचे फलक लावण्यात येतात. यंदाही हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्याला खुश करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी केली आहे. मात्र यामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासमोर अजित दादांच्या गटाने मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन केले आहे. अधिवेशन काळामध्ये लावण्यात येणारे बहुतांश फलक हे अनधिकृत असतात. अनधिकृत फलक उभारण्याबाबत उच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांना सप्त निर्देश दिले आहेत.
न्यायालयाचे निर्देश असतात नाही महापालिका प्रशासनाकडून या होर्डिंगबाजीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येते. गेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये महापालिका प्रशासनाने काही अनधिकृत फलक हटवले होते. त्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुती सरकारवर टीका केली होती. आता पुन्हा एकदा नागपूर मध्ये अनधिकृत फलकांची संख्या वाढली आहे. यामुळे सर्वाधिक फलक भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिसत आहेत.
Sudhir Mungantiwar : राज्यातील धान उत्पादकांना दिलासा; नोंदणीच्या मुदतीत वाढ
देवेंद्र फडणवीस हे स्वतः मुख्यमंत्री असल्याने भारतीय जनता पार्टीकडून विमानतळ ते सिव्हील लाइन्स परिसरामध्ये फलकांची जत्रा भरवण्यात आली आहे. महापालिकेचे अधिकारी देखील या कार्यकर्त्यांना काही बोलेनासे झाले आहेत. ‘जब सैया भयों कोतवाल तो डर काहे का’ अशा परिस्थितीमध्ये सध्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते वावरत आहेत. पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांना ‘देवाभाऊ’ कुठे ठेवू, इकडे जाऊ का तिकडे जाऊ असे झाले आहे.