महाराष्ट्र

Amravati : भावी मुख्यमंत्री राज ठाकरे!

Raj Thackeray : अमरावतीत स्वागताच्या बॅनरची चर्चा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे अमरावतीत येत आहेत. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. या उत्साहाला एवढा पूर आला आहे की कार्यकर्त्यांनी स्वागताच्या बॅनरवर ‘भावी मुख्यमंत्री राज ठाकरे’ असा उल्लेख केला आहे. सध्या या बॅनरची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे. आपल्या नेत्यावरील प्रेमापोटी अमरावतीमधील कार्यकर्त्यांनी हा प्रकार केला आहे. पण यापूर्वी पूर्व विदर्भात देखील राज ठाकरे यांच्यासाठी असेच बॅनर तयार करण्यात आले होते, हे विशेष.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची जय्यत तयारी सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. मनसेकडून विदर्भावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे दोन दिवसांच्या अमरावती दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागताची मनसेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरात ठिकठिकाणी राज ठाकरेंच्या स्वागतासाठी बॅनर लावण्यात आले आहेत. तर राज ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख देखील काही बॅनरवर करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. आता विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा नारा त्यांनी दिला आहे. निवडणुकीसाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. कार्यकर्ते ते पदाधिकारी यांच्या बैठकाही घेतल्या आहेत. नुकताच त्यांचा विदर्भ दौरा पार पडला. त्यानंतर आता पुन्हा राज ठाकरे यांनी विदर्भातील जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. ‘मिशन विदर्भ’ त्यांनी चांगलेच मनावर घेतले आहे.

27 सप्टेंबर आणि 28 सप्टेंबरला राज ठाकरे अमरावती जिल्ह्यात आहेत. या दोन दिवसांत ते विधानसभा निवडणुकीबाबत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. विदर्भातील अकरा जिल्ह्यांतील मोजक्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. राज ठाकरे यांचे अमरावती शहरात जय्यत स्वागत करण्यात येणार आहे. ठिकठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी मनसे कार्यकर्त्यांकडून बॅनर लावण्यात आले आहेत.

Sudhir Mungantiwar : महाविकास आघाडीत अडेलपट्टूपणा

राज यांचा अमरावतीत मुक्काम असणार आहे. अमरावतीच्या हॉटेल ग्रॅड मैफिल इन येथे ते थांबतील. त्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरची विशेष चर्चा आहे. त्यावर ‘ठाकरे घराण्यातील स्वाभिमानी भावी मुख्यमंत्री’, ‘हिंदू जननायक’ असा राज यांचा उल्लेख करण्यात आला आहे.

पहिले लक्ष विदर्भावर!

राज ठाकरे यांनी विदर्भावर विशेष लक्ष दिलं आहे. विदर्भातील काही मतदारसंघांतील उमेदवार त्यांनी जाहीर केले आहेत. आता या दौऱ्यात ही विदर्भातील जिथे मनसेची ताकद आहे, तेथील उमेदवार घोषित करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दौऱ्याकडे विशेष लक्ष लागून आहे.

error: Content is protected !!