राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. अनेक बहिणींच्या खात्यात पैसेही जमा झाले. आनंदाला उधाण आले. आता तर दुसऱ्या टप्प्याचा कार्यक्रमही सरकारने जोरात केला. परंतु, भंडारा जिल्ह्यात तुमसरमध्ये केवायसी झालेली नसल्याने बँका बहिणींना ओळखण्यास नकार देत आहेत. खात्यात तर पैसे आले, पण केवायसी झालेली नसल्याने पैसे काढता येत नाहीत, अशी स्थिती आहे. त्यामुळे सध्या बँकेच्या बाहेर केवायसीसाठी बहिणींच्या रांगा लागलेल्या आहेत.
येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत अनेक बहिणींची खाती आहेत. या बहिणींना ओवाळणी म्हणून आलेले पैसे मिळणं अवघड होऊन बसलं आहे. गेल्या दोन महिन्यांपासून येथे केवायसीच झालेली नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना आपल्या खात्यातून पैसेच काढता येत नाही. येथील कर्मचाऱ्यांच्या व्यवहारामुळे बहिणी त्रस्त झाल्या आहेत. काही बहिणींनी थेट मुख्यमंत्र्यांना बँकेतील कर्मचाऱ्यांची तक्रार केली आहे.
महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. प्रत्येक बहिणीला दीड हजार रुपये प्रति महिना देण्याची घोषणा केली. त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात महिलांनी राष्ट्रीयकृत बँकेत खाती उघडली. तुमसर येथील बँक ऑफ महाराष्ट्र येथे महिलांनी खाती उघडली. लाडक्या बहिणी आपल्या खात्यातून पैसे काढण्याकरिता रोज बँकेत जातात. परंतु त्यांना बँकेतील कर्मचारी तुमच्या खात्याची केवायसी झालेली नाही असे सांगत आहेत. त्यामुळे बहिणींना अजूनही पैसे मिळाले नाहीत.
ST Corporation : एसटी कर्मचाऱ्यांची बैठक निष्फळ, संपावर कर्मचारी ठाम !
गेल्या दोन महिन्यांपासून येथील बँकेत केवायसी झाली नसल्याची तक्रार बहिणींनी केली आहे. केवायसी करण्याकरिता एवढा उशीर कसा लागतो, असा प्रश्न महिलांनी विचारला. तर त्यावर बँकेचे कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देतात, असे महिलांनी सांगितले. ‘केवायसी प्रोसेसमध्ये आहे. त्याला वेळ लागतो’ अशाप्रकारची तांत्रिक कारणं देऊन वेळ मारून नेली जात आहे. त्यामुळे शेकडो महिलांना बँकेतून रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.
दिवाळीपर्यंत होईल का?
बँक ऑफ महाराष्ट्र येथे केवायसी करण्याची पद्धत वेगळी आहे का? त्याला दोन महिने वेळ लागतो का? असा थेट सवाल महिलांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. सणासुदीचे दिवस सुरू झाले आहेत. गौरी-गणपती, नवरात्र आणि पुढील महिन्यात दिवाळी आहे. तोपर्यंत तरी केवायसी पूर्ण होईल का, असा प्रश्न येथील महिलांनी विचारला आहे. या बँकेत केवायसीसाठी महिलांची प्रचंड गर्दी होत आहे. त्यामुळे बँकेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याची चौकशी करण्याची मागणी महिलांनी केली आहे.