Voting on ballot paper : विधानसभा निवडणुकीत उत्तम जानकर यांना एका गावातून केवळ 843 मते तर विरोधी भाजप उमेदवार राम सातपुते यांना 1003 मते मिळाल्याचं समोर आलं. यापूर्वी झालेल्या 2009, 2014, 2019 सालच्या विधानसभा निवडणूक आणि पाच महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत या गावाचे 80 टक्के मतदान जानकर यांच्या गटाला झाल्याचे पुरावे जोडले आहेत. यावेळी निवडणुकीत मोठे घोटाळे झाल्याचा आक्षेप घेण्यात आले आहेत. हे तपासण्यासाठी मंगळवारी, दि. ३ डिसेंबरला पुन्हा बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा ठराव गावाने केला.
यासाठी शासकीय कर्मचारी मिळावेत, अशी मागणी करीत संपूर्ण खर्च भरण्यास गाव तयार असल्याचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले होते. पण प्रशासनाने त्याला नकार दिला आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस मतदारसंघातल्या मारकडवाडी गावाची सध्या चर्चा आहे. या मतदारसंघातून शरद पवार गटाचे उत्तमराव जानकर विजयी झाले आहेत. पण मारकडवाडी गावामध्ये महायुतीच्या राम सातपुतेंनी मोठी मतं मिळवली. त्यामुळे शंका आलेल्या गावकऱ्यांनी तिथे बॅलेट पेपरवर फेरमतदान घेण्याची तयारी दर्शवली आहे.
मंगळवार, 3 डिसेंबरला मारकडवाडी गावात मतदान प्रक्रिया पार पडेल, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. मात्र प्रशासनाने याला विरोध केला आहे. त्यामुळे गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच 2 ते 5 डिसेंबर या कालावधीत कलम 163 लागू करण्यात आले आहे.
गावकऱ्यांचा असा आहे दावा
उत्तम जानकर यांचे मताधिक्य घटण्यामागे ईव्हीएमचे कटकारस्थान असल्याचा गावकऱ्यांना संशय आहे. मारकडवाडीमध्ये जानकर यांच्या बाजूने 80 टक्के मतदान झालेले असताना ईव्हीएममधून वेगळीच आकडेवारी समोर येत आहे. निवडणुकीत राम सातपुते यांना 843 मते, तर जानकर यांना 1003 मते मिळाली आहेत. या मतदानावर गावकऱ्यांना संशय आहे. त्यामुळे पुन्हा बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया राबवून ईव्हीएमची पोलखोल करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. सातपुते यांना मिळालेल्या 843 मतांवर संशय असून, त्यांना गावातून फारतर शे-दीडशे मते मिळायला पाहिजे होती, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
बॅलेटसाठी बुलेट झेलण्याची तयारी
गाव एकत्रित येऊन त्यांच्या खर्चाने बॅलेट पेपरवर जर मतदान घेत असेल तर शासनाला त्यावर आक्षेप घेण्याचे कारण काय असा सवाल करत मंगळवारी कुठल्याही परिस्थितीत ग्रामस्थ मारकडवाडी येथे मतदान करणारच असा इशारा नवनियुक्त आमदार उत्तम जानकर यांनी दिला. प्रशासनाने दबावात येऊन अंतरवाली सराटीप्रमाणे आमच्यावर लाठी हल्ला केला किंवा गोळ्या जरी झाडल्या तरी आम्ही गावात मतदान घेणारच असंही ते म्हणाले. माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी या ठिकाणी मंगळवारी बॅलेट पेपरवर मतदान होणार आहे. पण प्रशासनाने त्याला विरोध करत गावात जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. त्यानंतर आमदार उत्तम जानकर हे मारकडवाडीमध्ये पोहोचले आहेत.