शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी अकोला येथील कायदा सुव्यवस्था बिघडल्याचा आराेप करीत आंदोलन केले होते. मात्र त्यांनाच गुन्हेगारीचा सामना करावा लागला. त्यांचे सुपुत्र पृथ्वी देशमुख यांना किरकोळ वादातून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी तिघांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र एका आमदार पुत्राला क्षुल्लक कारणावरून भर रस्त्यात मारहाण होत असेल तर सामान्य नागरिकांचे काय? असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. त्यामुळे या घटनेवरून अकोल्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
काही महिन्यांपूर्वी विशाल धोटे या विद्यार्थ्याची कृषीनगर भागात गुंडांनी भोसकून हत्या केली होती. मुळचा बुलढाण्याचा हा तरुण अकोल्यात नीट अभ्यासक्रमाच्या कोचिंगसाठी आला होता. ट्युशन असलेल्या भागात विद्यार्थ्यांना गुंडांचा मोठा त्रास असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेने केला होता. यावेळी आमदार नितीन देशमुख यांनी शहरात पाेलिस प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप करीत मोर्चा काढला होता. तर या मुद्द्यावरून आमदार देशमुख यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही हा मुद्दा लावून धरला होता.
आमदार नितीन देशमुख यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले होते. टवाळखोर मुलांचा बंदोबस्त करण्याची मागणी पोलिसांना केली होती. त्यासाठी ताबडतोब खास पथकाची नेमणूक करावी असेही ते म्हणाले होते. कोचिंग क्लासेसच्या परिसरात अनेक कॅफे आहेत. या कॅफेमध्ये मुले-मुली अश्लील चाळे करतात. अशा कॅफे सेंटरवर धाडी टाकून ते कायमस्वरूपी बंद करण्यात यावे, ही मागणीही करण्यात आली होती.
अकोला शहरात तथा जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्त्यावर राजरोसपणे जुगार, अवैधरित्या दारू विक्रीसारखे धंदे सुरू आहेत. ते बंद करण्यासाठी धडक कारवाई करावी, असेही देशमुखांच्या निवेदनात होते. जिल्ह्यामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. अशा अपराध्यांवर वचक राहील व त्यामुळे समाजातील अशा प्रवृत्तीच्या लोकांवर पोलिसांची दहशत निर्माण होईल यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात. इत्यादी मागण्यांसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलं होतं.
देशमुख यांच्या पुत्रालाच मारहाण!
अकोला शहरासह जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. दिवसाढवळ्या हल्ले, हत्या, अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमधून तीव्र रोष व्यक्त होत आहे. तर आमदार देशमुख यांनाही याचा सामना करावा लागला आहे. मित्रांच्या वादात मध्यस्थी करणाऱ्या आमदार पुत्राला किरकोळ वादातून मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी सिव्हील लाइन पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरुन मारहाण करणाऱ्या तीन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान या घटनेनंतर खळबळ उडाली.
तर आम्हीच गुंडांचा बंदोबस्त करू
अकोल्यात गुन्हेगारी वाढल्याचे वारंवार पोलीस अधीक्षक यांच्या निदर्शनात आणून दिले. काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला होता. आज पोलीस ठाण्यात आलो तर तीनच पोलीस हजर होते. विनंतीनुसार काय कारवाई करतात हे पाहू. पोलिसांनी कारवाई केली नाही, तर गुंडांचा बंदोबस्त आम्हाला करावा लागेल, असा इशारा आमदार नितीन देशमुख यांनी दिला आहे.