Assembly Election : अकोला जिल्ह्यातील काही मतदारसंघांवरून महायुतीत जागावाटपाचे घोडे अडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून अकोल्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघावरून महायुतीत घमासान सुरू आहे. शिवसेना शिंदे गटाकडून जिल्ह्यातील बाळापूर आणि अकोट मतदारसंघावर दावा केला जात आहे. असे असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानेही बाळापूरवर दावा ठोकला आहे. अजित पवार गटाचे नेते संदीप पाटील यांनी या मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे आगामी काळात महायुतीतील नेत्यांना मोठी कसरत करावी लागण्याची शक्यता आहे.
लवकर निवडणूक..
राज्यात येत्या दोन दिवसांत विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुकांचे दावे-प्रतिदावे दिवसेंदिवस वाढत आहेत. वाढत्या दाव्यामुळे प्रमुख पक्षांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. मात्र त्यापूर्वी यातील प्रमुख पक्ष वेगवेगळ्या मतदारसंघांवर दावे करताना दिसत आहेत. दरम्यान अकोल्यातही ही रस्सीखेच मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.
अकोल्यात भाजप..
अकोला जिल्ह्यात पाच मतदारसंघांमध्ये भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे पाच पैकी किमान चार मतदारसंघ आपल्याला मिळावे अशी भाजप नेत्यांची इच्छा आहे आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटही दोन जागांसाठी आग्रही आहे. अशातच बाळापूर या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानेही दावा ठोकला आहे. जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघात अजित पवार गटाची मोठी ताकद असल्याचा दावाही करण्यात आला आहे. शिवसंग्राममधून राष्ट्रवादीत आलेले संदीप पाटील यांनी या मतदारसंघासाठी मोठी तयारी सुरू केली आहे. त्यांनी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडे या मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाच्या इच्छुकांनीही या मतदारसंघावर दावा केला आहे. तर भाजपचे काही इच्छुक या मतदारसंघासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे या मतदारसंघात इच्छुकांच्या दाव्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
बाळापूरसाठी शिवसेना शिंदे गटातील अनेक इच्छुकांची नावे पुढे आली आहेत. माजी आमदार गोपिकीशन बाजोरिया यांनी या मतदारसंघावर दावा केला आहे. त्यांनी अकोट आणि बाळापूर हे दोन मतदारसंघ आपल्यासाठी सुटावे अशी मागणी केली होती. तर भाजपकडूनही काही जण इच्छुक आहेत. दरम्यान स्व. विनायक मेटे यांचे निकटवर्तीय शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यांनी देखील बाळापूरवर लक्ष केंद्रित केले आहे.
संदीप पाटील यांनी बाळापूर मधून यापूर्वी अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना 20 हजारांवर मतदान मिळाले होते. आता पुन्हा त्यांनी या मतदारसंघावर महायुती कडे उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे बाळापूरवरून भाजप, शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी यांच्यात मोठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. नेमका हा मतदारसंघ कुणाच्या वाट्याला येणार हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र त्यापूर्वी जिल्ह्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमध्ये मतदारसंघ मिळविण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. अकोल्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघ हा अशा सर्वाधिक प्रबळ दावेदारीचा मतदारसंघ आहे. युतीमध्ये सुरुवातीपासून भाजपकडे आणि त्यानंतर शिवसेनेकडे असलेल्या या मतदारसंघावर आता अजित पवार गटाने दावा केला आहे.
कोण आहेत संदीप पाटील?
दिवंगत नेते विनायक मेटे यांचे निकटवर्तीय म्हणून संदीप पाटील यांची ओळख आहे. शिवसंग्रामचे ते प्रदेश उपाध्यक्ष होते. सुरुवातीला त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला. संदीप पाटील यांनी एकदा या मतदारसंघातून आपले नशीब आजमावले आहे. शिवसंग्राम हा युतीचा घटक पक्ष असताना त्यांच्यावर बंडखोरी केल्याचा आरोप करण्यात आला होता. आपण बंडखोरी केली नसून आपल्याला पक्षाने अधिकृत एबी फॉर्म दिल्याचा दावा पाटील यांनी केला होता. 2014 मध्ये संदीप पाटील यांच्या उमेदवारीमुळे भाजपच्या उमेदवाराला मोठा फटका बसला होता. तर 2019 मध्ये त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता.
वंचित आघाडीचं ठरलं!
काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार नातिकोद्दिन खतीब यांनी काँग्रेसला सोडून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. वंचित आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत नातिकोद्दिन खतीब यांना बाळापूरमधून उमेदवारीही देण्यात आली. दरम्यान खतीब यांच्या वंचित मधील प्रवेशाने बाळापुर मधील समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलणार आहेत. तर खतीब यांच्या काँग्रेस सोडण्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे.