Assembly Election : बडनेराचे आमदार रवी राणा यांनी नुकतेच लाडके बहिणी योजनेवर वादग्रस्त वक्तव्य केले. राणा यांच्यावर काँग्रेस नेते तथा विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तिखट शब्दात टीका केली होती. वडेट्टीवार यांच्या टिकेनंतर लगेचच भाजपचे माजी नगरसेवक तुषार भारतीय यांनीही टिकास्त्र डागले. अशात रवी राणा यांना महायुतीच्या बैठकीतून डच्चू देण्यात आला आहे. आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने जोरदार तयारी सुरू केली आहे. याच तयारीचा भाग म्हणून महायुतीच्या नेत्यांच्या समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
महायुतीच्या नेत्यांच्या समन्वय समितीची बैठक अमरावती येथे होणार आहे. या बैठकीला आमदार रवी राणा यांना बोलावण्यात आलेले नाही. रवी राणा यांच्या पत्नी माजी खासदार नवनीत राणा आता भाजपच्या नेत्या आहेत. त्यामुळे नवनीत राणा या बैठकीत असतील, असे सांगण्यात येत आहे. मात्र रवी राणा किंवा त्यांचा पक्ष युवा स्वाभिमान महायुतीत नसल्यानेही त्यांना बैठकीसाठी बोलाविण्यात आलेले नाही. याशिवाय रवी राणा यांनी नुकतेच लाडके बहिणी योजनेवर वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांना हे वक्तव्य भोवले का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
अमरावती सतत चर्चेत
राजकीय वर्तुळात अमरावती जिल्हा सातत्याने चर्चेत असतो. लोकसभा निवडणुकीदरम्यान देखील अमरावतीच्या राजकारणात हायव्होल्टेज ड्रामा रंगला होता. महायुती मधील सर्वच नेत्यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. त्यानंतरही भाजपने नवनीत राणा यांना पक्षात घेत उमेदवारी दिली. त्यामुळे प्रचंड दुखावलेल्या आमदार बच्चू कडू यांनी स्वतंत्र उमेदवार निवडणुकीसाठी रिंगणात उतरवला होता. महाविकास आघाडीसह महायुती मधील नेत्यांनीही नवनीत राणा या पराभूत व्हाव्या, यासाठी जोरदार काम केले. त्याचा फटका भाजपला बसला.
निवडणूक आटोपल्यानंतर रवी राणा आणि नवनीत राणा यांना होणारा विरोध दिवसेंदिवस वाढतच आहे. नवनीत राणा यांच्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत रवी राणा यांना पराभूत करण्यासाठी त्यांच्या विरोधकांनी जोर लावण्यास सुरुवात केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हीकडील नेत्यांशी राणा दाम्पत्याचे बऱ्यापैकी बिनसलेले आहे. राणा यांनी आतापर्यंत केवळ नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांनाच सन्मान प्रदान केला. स्थानिक एकाही नेत्याशी राणा यांचे गणित जुळले नाही. त्यामुळे अमरावतीत होत असलेल्या भाजपच्या बैठकीपासून त्यांना दूर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.
नवनीत राणा या भाजपच्या नेत्या असल्या तरी त्यांचे पती रवी राणा महायुतीमध्ये नाहीत. त्यामुळे त्यांना महायुतीच्या घटक पक्षातील बैठकीत बोलावण्याचे काहीच औचित्य नाही असा युक्तिवाद नेत्यांचा आहे. निमंत्रण नसतानाही रवी राणा हे बैठकीला आले तर, त्यांना योग्य तो सन्मान मिळेल की नाही याबाबत महायुतीमधील नेते मौन आहेत. प्रदेश किंवा वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून राणा हे स्वतःला महायुतीच्या बैठकीसाठी निमंत्रित करून घेऊ शकतात. पण हा प्रकार कशात मोडतो, हे जनतेने समजून घ्यावे अशी टीका महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही कडील नेते करीत आहेत.