Badlapur Cases : बदलापूर येथे शाळकरी चीमुकल्यांवर अत्याचार करणारा अक्षय शिंदे याचा सोमवारी एन्काऊंटर झाल्याने खळबळ उडालीये. पोलिसांनी सेल्फ डिफेन्समध्ये त्याचा एन्काऊंटर केल्याचं सांगितलं आहे. मात्र प्रकरणावरून विरोधकांनी आता सरकारवर जोरदार टीका केली आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी पोलिसांची रिव्हॉल्व्हर घेतोच कशी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला की खरंच ‘सेल्फ डिफेन्स’ होता, याबाबत चर्चांना उधाण आलाय. या एन्काऊंटरसंबंधी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विरोधकांनीही मुद्दे उपस्थित करत पोलिस आणि सरकारवर संशय व्यक्त केलाय.
अक्षय शिंदे याने पोलीस अधिकाऱ्याचे रिव्हॉल्व्हर खेचून तीन राऊंड फायर केले. यामध्ये एपीआय निलेश मोरे जखमी झाले, त्यानंतर पोलिसांनी स्वरक्षणासाठी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर केला. मात्र हे प्रकरण दाबण्यासाठी अक्षय याला पोलिसांनी मारल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या प्रकरणावरून सरकारवर आरोप केले जात आहे.
मृत घोषित
अक्षय अण्णा शिंदे, वय 24, हा आरोपी पॉक्सो कायद्याखाली विविध गुन्ह्यांसाठी तळोजा मध्यवर्ती कारागृहात न्यायबंदी होता. बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यातील गुन्ह्याच्या तपासासाठी आरोपीला ट्रान्सफर वॉरंट सह ताब्यात घेण्यात आले. दरम्यान मुंब्रा बायपासजवळ पोलिसांच्या गाडीमध्ये आरोपीने पोलीस अधिकाऱ्याचे पिस्तुल खेचून तीन राऊंड फायर केले. फायरमधून एक राऊंड सहायक पोलिस निरीक्षक निलेश मोरे यांच्या मांडीला लागला. स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी प्रत्युत्तरात गोळीबार केला. ज्यात आरोपी अक्षय शिंदे जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आरोपीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन जे जे रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात येत आहे
पोलिसांचा हलगर्जीपणा संशयास्पद- शरद पवार
आरोपीला कायद्याच्या चौकटीतून फाशी व्हायलाच हवी होती. परंतू या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरीत करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे. या घटनेच्या सखोल चौकशीतून वस्तुस्थिती पुढे येणं अपेक्षित आहे.
न्यायमूर्तींमार्फत चौकशी करा- नाना पटोले
बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेच्या विश्वस्तांना अद्याप अटक झालेली नाही, ते फरार आहेत. त्यांना अद्याप अटक का होऊ शकत नाही ? फरार आरोपींना वाचवण्यासाठी या प्रकरणातील मुख्य आरोपीचे एन्काऊंटर करून प्रकरण संपवण्याचा प्रयत्न आहे का? या प्रकरणाचे सत्य समोर येण्यासाठी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींमार्फत चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
याची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे- विजय वडेट्टीवार
अक्षय शिंदे याने गोळी झाडून घेणे म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का? अक्षय शिंदे याने गोळी नेमकी कशी झाडली? आरोपी अक्षय पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचे हात बांधले नव्हते का? त्याला बंदूक कशी काय मिळाली? पोलीस इतके बेसावध कसे असू शकतात? बदलापूर प्रकरणात एकीकडे संस्थाचालक भाजपशी सबंधित असताना संस्थाचालकांवर कारवाई होत नाही. दुसरीकडे आज आरोपी अक्षय शिंदे स्वतःवर गोळी झाडून घेतो हे अतिशय धक्कादायक आणि संशयास्पद आहे..
स्वसंरक्षणाचा बनाव – अनिल देशमुख
बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाल्याचे वृत्त समजले. स्वसंरक्षणाचा हा बनाव विश्वास ठेवण्यासारखा नाही. दोन्ही हातात बेड्या असलेला माणूस पोलिसांचेही पिस्तूल कसे काढू शकतो. सदर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे जेवढा दोषी होता तितकेच दोषी शाळा चालक भाजप पदाधिकारी देखील आहेत. आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्याला वाचवण्यासाठी आणि प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह सेट केले जात आहे.
न्यायव्यवस्थेची थट्टा- सुप्रिया सुळे
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण सरकारने अतिशय चुकीच्या पद्धतीने हाताळले आहे. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात उशीर करण्यात आला. लोकांच्या प्रचंड दबावानंतर एफ आय आर दाखल करण्यात आली. पण आता आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. कायदा सुव्यवस्था आणि न्यायव्यवस्थेची ही शासन पुरस्कृत थट्टा आहे.
स्वसंरक्षण की हत्या?- वर्षा गायकवाड
एखाद्या हायप्रोफाईल प्रकरणातील आरोपीला ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना सहसा अनेक पोलिस कर्मचारी बरोबर असतात. पोलिसांच्या गराड्यात असताना बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे पोलिसांचे पिस्तूल हिसकावून पोलिसांवरच गोळ्या झाडतो, यावर कुणाचा विश्वास बसेल? आणि ते जरी घडलं असेल तर पोलिसांनी त्याला आटोक्यात आणून का पकडलं नाही? हे संपूर्ण प्रकरण अत्यंत गंभीर आणि संशयास्पद आहे. पोलीस आणि राज्याच्या गृहखात्यात नक्की चाललंय तरी काय?