Election Commission : विधानसभा निवडणूकीच्या तयारीला वेग आला आहे. सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे. अश्यात प्रहार जनशक्तीचे नेते बच्चू कडू यांनी वेगळी चूल मांडण्याचा इशारा महायुतीला दिला आहे. त्यादृष्टीने त्यांच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्तीला ‘बॅट’ हे चिन्ह मिळाले आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत या ‘बॅट’ने बच्चू कडू महायुतीच्या विरोधात ओपनिंग करणार की महाविकास आघाडीच्या विरोधात, याची उत्सुकता असेल.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती संघटनेला निवडणूक आयोगाकडून बॅट हे चिन्ह मिळालं आहे. राज्याच्या राजकारणात जोरदार बॅटिंग करणारे शेतकरी नेते बच्चू कडू आता विधानसभा निवडणुकीतही बॅटिंगसाठी सज्ज झाले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर आता खऱ्या अर्थाने वेध लागले आहेत ते विधानसभा निवडणुकीचे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाला. आता आघाडी-युतीच्या लढाईत तिसऱ्या आघाडीनेही दंड थोपटले आहेत.
हटके चिन्ह
राज्याच्या राजकारणात बच्चू कडू हे नाव कुणाला माहीत नसेल, असं नाही. अशातच एक मोठी बातमी समोर येत आहे. निवडणूक आयोगाने आज काही राजकीय पक्षांना आगामी निवडणुकीत पक्ष चिन्ह जाहीर केले आहेत. शेतकरी नेते आणि आपल्या हटके आंदोलनासाठी प्रसिद्ध असलेले बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला निवडणूक आयोगाने बॅट हे चिन्ह दिलं आहे. शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, तसेच दिव्यांगबांधव या समाजातील तळागाळातील लोकांसाठी सातत्याने झटत असतात. त्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवत असतात. आता हाच आवाज आगामी विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात ऐकू येणार आहे.
Assembly Election : जम्मुतील सुरक्षेमुळे महाराष्ट्रातील निवडणुकीला ‘ब्रेक’
निवडणुकीसाठी सज्ज
गेल्या काही दिवसांपासून आमदार बच्चू कडू हे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. राज्यात तिसऱ्या आघाडीसाठी देखील प्रयत्न सुरू आहेत. अशातच कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला निवडणूक आयोगाकडून बॅट हे चिन्ह देण्यात आले आहे. यापूर्वी बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाने अनेकदा ‘कप बशी’ चिन्हावर निवडणूक लढवली होती. लोकसभा निवडणुकीत प्रहारला शिटी हे चिन्ह मिळालं होतं. यानंतर आता प्रहार पक्षाला पुढच्या निवडणुका बॅट या चिन्हावर लढवाव्या लागणार आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या आधी प्रहार जनशक्ती पक्षाला हे चिन्ह मिळालं आहे. त्यामुळे प्रहार पक्ष आता विधानसभा निवडणुका बॅट या चिन्हावर लढवू शकतो. बच्चू कडू यांनी भारतीय निवडणूक आयोगाकडे अधिकृत निवडणूक चिन्हासाठी अर्ज केला होता.