Target On Government : अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा सरकारवर प्रहार केला आहे. यावेळी त्यांनी पुन्हा राज्य सरकारला आव्हान दिले आहे. सध्या बच्चू कडू राज्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सरकारसह काँग्रेसवरही जोरदार टीका केली आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये धमक असेल तर त्यांनी प्राध्यापक आणि आमदारांची वेतन कपात करावी. आपल्या पक्षाचे किंवा घाडीचे 25 आमदार निवडून आल्यास सर्वांत प्रथम हेच काम करू असे बच्चू कडू म्हणाले.
महाराष्ट्राचे राज्यपाल राहतात त्या राजभवनावरही कडू यांनी टीका केली. राजभवन 40 एकराच्या परिसरात आहे. राज्यपालांचे हातपाय किती लांब असतात हे आता बघावे लागेल, असेही ते म्हणाले. राज्यपालाच्या घराच्या चारही बाजुला समुद्र. नयनरम्य दृष्ट आहे. शेतकरी, कष्टकऱ्याला तर सगळीकडे संघर्ष आणि मृत्यू दिसतो. कष्टकऱ्यांसाठी कोणती योजना आहे. घरी बसून खा आणि फक्त दीड हजार रुपये घ्या एवढेच आहे. अशा पद्धतीचे भाष्य करीत बच्चू कडू यांनी लाडकी बहीण व लाडका भाऊ योजनेवर निशाणा साधला. महाराष्ट्राला सामान्यांचे कल्याण कराला मुख्यमंत्री हवा आहे, असेही ते म्हणाले.
वायफळ खर्चावर टीका
बच्चू कडू यांनी राज्यकर्त्यांकडून होणाऱ्या वायफळ खर्चावर टीका केली. प्राध्यापक आणि आमदारांचे वेतन सर्वाधिक असल्याचे ते म्हणाले. भाजप आणि काँग्रेसमध्ये धमक असेल तर त्यांनी ती धमक दाखवावी. वेतन कमी करावे. सद्य:स्थितीत प्राध्यापकाला अडीच लाख रुपये मिळतात. आमदाराला तीन लाख पगार आहे. एवढा पैसा कशासाठी. अशी कोणती कामे करतात ही लोक. एकाचे ताट रिकामे आणि दुसऱ्या भरून सांडणारे. हा असमतोल नाही का? हे राज्या कोणाच्या बापाचे आहे का? असा सवालही त्यांनी केला.
बच्चू कडू म्हणाले, आम्ही तिसऱ्या आघाडीच्या फंद्यात पडणार नाही. महायुती आणि महाविकास आघाडी यांचे मत घेऊन निर्णय घेऊ. संभाजीनगर येथे नऊ ऑगस्टला एक निवेदन जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर आम्ही महायुती आणि महाविकास आघाडी यांचे मत जाणून घेऊ. राज्यात सध्या बच्चू कडू तिसरी आघाडी स्थापन करू शकतात असे सांगण्यात येत आहे. रविकांत तुपकर, राजू शेट्टी आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना त्यांनी साद घातली आहे. मात्र याबाबत तिघांनीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.