Assembly Election : पक्षाची उमेदवारी मिळावी यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. निवडणुकीच्या काळातच पक्षातील आऊटगोइंग इन्कमिंग मोठ्या प्रमाणात वाढते. अकोल्यातील एक उमेदवार यावरूनच चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांनी एकाच आठवड्यात तीन पक्ष पालथे घातले. अखेर त्यांना बच्चू कडू प्रणित प्रहार जनशक्ती पक्षाची उमेदवारी मिळाली. यावरूनच अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरचे प्रहारचे उमेदवार रवी राठी जिल्ह्यात सध्या चर्चेतील उमेदवार ठरले आहेत.
तारीख संपली
विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख संपली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी न मिळाल्याने सर्वच पक्षात तुफान बंडखोरी पाहायला मिळाली. आता बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न केले जातील. मात्र ज्यांना या पक्षात उमेदवारी नाही मिळाली तर दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या आयाराम-गयाराम यांचीही संख्या मोठी आहे.
अकोल्यात तर एका आठवड्यात तीन पक्षाची वारी करणाऱ्या एका उमेदवाराची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. अकोल्यातील मूर्तिजापूर मतदारसंघातील प्रहारचे उमेदवार रवी राठी यांनी आठवड्यात तीन पक्ष बदलत तिसऱ्या पक्षाचे तिकीट मिळविले.
सारं काही सत्तेसाठी
रवी राठी हे गेल्या विधानसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात होते. त्यांना गेल्या निवडणुकीत या पक्षाची उमेदवारीही मिळाली होती. मात्र पराभव झाल्याने त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीकडून तयारी सुरू केली.
आगामी निवडणुकीत उमेदवारी मिळेल, अशी आशा त्यांना होती. मात्र जेव्हा या पक्षाची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा आपल्याला मिळाली नसल्याचे समजलं. तिकीट नाकारल्याने आठवडाभरा आधी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नागपूर येथे भाजपमध्ये प्रवेश घेतला.
रवी राठी ‘बॅक फूट’वर
रवी राठी यांना भाजपकडून तिकीट मिळणार असं आश्वासन दिल्याचा दावा त्यांनी केला. उमेदवारी मिळणार अशी चर्चाही रंगली होती. मात्र भाजपने एनवेळी विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांना तिकीट जाहीर केल्याने पुन्हा रवी राठी ‘बॅक फूट’वर गेले. त्यानंतर नाराज रवी राठी यांनी भाजपला लगेच सोडचिठ्ठी देत बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला.
उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे रवी राठी हे एका आठवड्यात तीन पक्षाची वारी केलेले उमेदवार म्हणून आता चर्चेत आले आहेत. त्यामुळे तीन पक्षाची केली वारी.शेवटी बच्चू भाऊंनी दिली उमेदवारी अशी चर्चाही रंगली आहे. रवी राठी हे गेल्या विधानसभा निवडणुकीत रिंगणात होते. त्यावेळी चांगलं मतदान त्यांना मिळाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्यांनी निवडणूक लढवली होती. 2019 मधील विधानसभा निवडणुकीत रवी राठींना राष्ट्रवादीचे तिकिटावर तिसऱ्या क्रमांकाची म्हणजेच 42 हजार मते मिळाली होती.