Scheme For Disabled Persons : दिव्यांगांना निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरविल्याने आमदार बच्चू कडू यांनी कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्याला कानशिलात हाणली. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अधिकारी, कर्मचाऱ्यांसह कंत्राटदारांमध्ये खळबळ उडाली आहे. संभाजीनगर येथे बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांच्या मदतीने साहित्याची तपासणी केली. त्यावेळी पुरविण्यात आलेले साहित्य निकृष्ट आढळल्याने त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्याच्या कानशिलात हाणली.
दिव्यांग विभागाकडून काही दिवसांपूर्वी ई-रिक्षाची खरेदी करण्यात आली होती. या ई-रिक्षा दिव्यांगांना पुरविण्यात आल्या होत्या. रिक्षांचा अपघात होत असल्याचे व नियंत्रण सुटत असल्याची तक्रार बच्चू कडू यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी दिव्यांग विभागाच्या अधिकाऱ्यांना तपासणीसाठी बोलावले. याचवेळी रिक्षा पुरविणाऱ्या कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. तपासणी सुरू असताना ई-रिक्षाच्या बॅटरी निकृष्ट दर्जाच्या असल्याचे आढळले. त्यामुळेच या वाहनांचा अपघात होतो व वेळोवेळी नियंत्रण सुटते असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अधिकाऱ्याला पाहताच संताप
अधिकारी आणि दिव्यांग यासंदर्भात बच्चू कडू यांना माहिती देत होती. त्याचवेळी ई-रिक्षा पुरविणाऱ्या कंत्राटदाराच्या कंपनीतील एक अधिकारी चर्चेच्या ठिकाणी पोहोचला. या अधिकाऱ्याला पाहताच बच्चू कडू यांचा संयम सुटला. क्षणाचाही विचार न करता त्यांनी या अधिकाऱ्याला कानशिलात लगावली. बच्चू कडू यांच्या आसपास उभ्या असलेल्या अनेकांनी ही घटना कॅमेऱ्यात कैद केली. अधिकारी चर्चेच्या ठिकाणी येताच त्याच्यावर सगळ्यात आधी बच्चू कडू यांनी हात उगारला. काही कळण्यापूर्वीच हा प्रकार घडल्याने अधिकाऱ्यालाही धक्का बसला.
कंत्राटदाराने या निकृष्ट दर्जाच्या ई-रिक्षा दिव्यांगांना पुरविल्या. यात चर्चेच्या ठिकाणी आलेल्या अधिकाऱ्याचा काय दोष होता असा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित होत आहे. ई-रिक्षा पुरविण्यात आल्या, त्यावेळी दिव्यांग विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली नव्हती काय, असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे. अधिकाऱ्यांनी तपासणी न करताच या ई-रिक्षा दिव्यांगांना पुरविल्या असतील, तर दिव्यांग विभागही हे निकृष्ट साहित्य पुरविण्यासाठी तितकेच जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर या रिक्षा दिव्यांगाना पुरविल्या असतील तर बच्चू कडू यांनी या विभागात कुठे पाणी मुरत आहे, याचा शोध घेणे गरजेच झाले आहे. केवळ एका अधिकाऱ्यावर हात उचलून काहीच होणार नाही, असे आता दिव्यांग बांधवच बोलत आहेत. दिव्यांगांसाठी असलेल्या योजनांमध्ये गैरप्रकार होत असल्यास त्याला त्या खात्याच्या प्रमुखांचे दुर्लक्षही तितकेच जबाबदार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.