‘Prahar’ On Mahayuti : प्रहारचे नेते आमदार बच्चू कडू यांच्या आक्रोश मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. शुक्रवारी (ता. 9) आमदार कडू हे सरकारच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर येथे मोर्चा काढणार आहेत. त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना मोर्चा न काढण्याची सूचना केला आहे. यावरून सामान्यांचे भिडू बच्चू कडू संतापले आहेत. बच्चू कडू यांनी आता महायुती सरकारला इशारा दिला आहे. ऑगस्ट क्रांती दिनी आम्ही मोर्चा काढणार आहोत. मोर्चामध्ये सरकारपुढे मागण्या मांडल्या जाणार आहेत. मोर्चा अडवला तर स्फोट होईल असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर मध्ये आम्ही उद्या मोर्चा काढणार आहोत. आम्हाला कोणी रोखू शकत नाही कोणतीही शक्ती आम्हाला थांबू शकत नाही. आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला किंवा जाणीवपूर्वक शेतकरी, शेतमजूर यांच्या या मोर्चात कोणी जर आडवे येत असेल तर त्याचा स्फोट होईल. पोलिसांनी आडकाठी केली तर आमची पूर्ण ताकद आहे, असेही बच्चू कडू म्हणाले. शेतमजुरांसाठी सध्या कोणतीही योजना अस्तित्वात नाही. प्रकल्पग्रस्तांची जमीन गेल्यानंतर त्यांना नोकरी मिळत नाही. दिव्यांग्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत. त्यामुळे मोर्चा काढत असल्याचे ते म्हणाले.
मंत्रालयाचा फायदा काय?
महायुती सरकारमध्ये दिव्यांग मंत्रालय झाले पण मानधन वाढले नाही. दिव्यांगांना घरकुल नाही. दिव्यांगांना रोजगाराच्या संधी नाहीत. त्यामुळे आम्ही आवाज उठवला आहे. मोर्चा अडवून आमचा आवाज दाबता येईल. पण शेतकरी, शेतमजूरांचा आवाज कसा दाबणार असा प्रश्नही बच्चू कडू यांनी उपस्थित केला. मोर्चात मांडण्यात आलेल्या मागण्या सरकारने मान्य कराव्या. यासंदर्भात शासन निर्णय (GR) काढावे. असे झाले तर स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचे काही कारण नाही. मागण्या मान्य न झाल्यास आम्ही शेतकरी, शेतमजुरांना घेऊन ताकदीने निवडणुकीला सामोरे जाऊ, असे बच्चू कडू म्हणाले.
छत्रपती संभाजीनगरातील मोर्चा पोलिसांकडून अडविण्यात येऊ शकतो, अशी शक्यता आहे. यावर बच्चू कडू म्हणाले की, मोर्चासाठी पोलिसांनी आम्हाला थांबवण्याचे धाडस करू नये. पोलिसांनी दंडा उचलला तर आम्ही आणखी ताकदीने समोर जाऊ. मोर्चानंतर महायुतीत राहायचे की नाही राहायचे याबाबत निर्णय होईल. आपण निवडणुकीसाठी कोणत्याही जागा मागितलेल्या नाहीत. आमदार किंवा मंत्रिपदही मागितलेले नाही. खास मुद्द्यांवर आमचा लढा सुरू आहे. मागण्या मान्य न झाल्यास त्याचे अत्यंत गंभीर परिणाम महायुतीला भोगावे लागतील.