Bacchu Kadu : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने अमरावतीत नवनीत राणांचा प्रचार करत आहेत. फडणवीस यांनी नुकतीच दर्यापूर येथे नवनीत राणांसाठी प्रचारसभा घेतली. यावेळी बोलताना महायुतीतल्या सर्व प्रमुख नेत्यांचा आणि पक्षांचा उल्लेख केला. मात्र फडणवीसांनी बच्चू कडू आणि त्यांच्या पक्षाचा उल्लेख करणे टाळले. यावर आता बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आमचा उल्लेख केला नाही. आमच्या पक्षाचे नाव घेतले नाही. यासाठी मी त्यांचा आभारी आहे. त्यांनी आमचेच काम केले आहे. त्यांनी आमचे नाव घेतले असते तर लोकांच्या मनात शंका निर्माण झाल्या असत्या, असे बच्चू कडू म्हणाले. बच्चू कडू यांनी अमरावतीत प्रहारकडून दिनेश बूब यांना लोकसभेचे तिकीट दिले आहे. बच्चू कडू हे दिनेश बूब यांचा प्रचार करत आहेत. त्यामुळे बच्चू कडू आणि भाजपमध्ये वाद वाढला आहे. बच्च कडू गेल्या काही महिन्यांपासून महायुतीवर नाराज आहेत. कडू यांनी त्यांची नाराजी सातत्याने बोलून दाखवली आहे.
पुन्हा राणांवर टीका
बच्चू कडू म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच वर्ध्यात सभा झाली. सभेत मोदी म्हणाले उमेदवाराबाबत तुमच्या मनात नाराजी असेल, तर तुम्ही माझ्याकडे पाहून मत द्या. त्यामुळे मोदींनी स्पष्ट सांगितलं की, आमचा उमेदवार कार्यक्षम नाही. आमचा उमेदवार काहीच करू शकत नाही. मोदींनी जनतेला इतका स्पष्ट संदेश दिला आहे. भाजपाचा उमेदवार कार्यक्षम नाही हे त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होते. भाजपा उमेदवाराने मोदींसारख्या मोठ्या नेत्यावर असे वक्तव्य करण्याची वेळ आणणे ही मोठी शोंकांतिका आहे. भाजपासाठी ही दुर्दैवी गोष्ट आहे, असे कडू म्हणाले. अमरावतीत बच्चू कडू आणि खासदार नवनीत राणा यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष कायम आहे.
Lok Sabha Election : मतदान संपले,नेते करताय मतांची गोळाबेरीज
बायकोनेच पक्ष फोडला
रवी राणा यांचा पक्ष त्यांच्याच पत्नीनेच फोडला. युवा स्वाभिमान पक्ष सोडून त्या भाजपमध्ये सामील झाल्या. आता ते प्रचार सभेसाठी दबाव टाकत आहेत, असे कडू म्हणाले. प्रहारचे उमेदवार दिनेश बूब यांच्यासाठी 24 तारखेला सायन्स कोर मैदान आधीच बुक केले आहे. मात्र त्याच मैदानावर नवनीत राणा यांच्यासाठी अमित शाह सभा घेणार आहेत. आता प्रशासन आमच्यावर दबाव आणत आहे की, मैदान सोडावे लागेल. मैदान आरक्षण करण्यासाठी आम्ही पैसे भरले, त्याची पावती आमच्याकडे आहे. मात्र आता मैदान सोडण्यासाठी आमच्यावर दबाव येत आहे, असे बच्चू कडू म्हणाले. आम्हाला जर मैदान मिळाले नाही, तर आम्ही जन आंदोलन उपोषण सुरू करू, असे ते म्हणाले.