महाराष्ट्र

NCP : बच्चू कडू म्हणाले, ‘ते लोक अजित पवारांची साथ सोडतील’

Bacchu Kadu : राष्ट्रवादीच्या कोणत्या आमदारांबद्दल वर्तवले भाकित?

Assembly Election : महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच होणार आहे. हे आता निश्चित झालं आहे. तिसऱ्या आघाडीच्या स्थापनेचा प्रयत्न झाला, पण त्यातून सत्ता काबीज करणं शक्य नाही. हे लक्षात आलं. त्यामुळे कदाचित स्वतंत्र लढून ‘जिधर दम उधर हम’ अशी भूमिका छोटे पक्ष घेऊ शकतात. या संभाव्य तिसऱ्या आघाडीचा एक भाग असलेले आमदार बच्चू कडू यांनी राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) आमदारांबद्दल एक मोठं विधान केलं आहे. ‘हे आमदार निवडून येण्यासाठी अजितदादांची साथ सोडून शरद पवारांकडे मोर्चा वळवतील,’ असं विधान बच्चू कडू यांनी केलं आहे.

कडू यांचे भाकीत

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी अजित पवार यांच्यावरील या विधानानंतर तर्क वितर्क सुरू झाले आहे. ‘कोणत्याही आमदाराला सर्वप्रथम निवडून येणं हेच महत्वाचं असतं. त्यामुळे, ते आमदार प्रसंगी अजित पवारांची साथ सोडतील. आणि शरद पवार गटात जाऊन निवडणूक लढवतील,’ असं भाकित त्यांनी केलं आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणूकीचे वारे वाहायला लागले आहेत. राजकीय नेत्यांनी विधानसभा निवडणुकांच्या घोषणेपूर्वीच दौरे आणि मतदारसंघाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीनंतर राज्यात तिसऱ्या आघाडीचा पर्यायावर चर्चा सुरू आहे. प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि इतर लहान पक्ष, संघटना, अपक्ष आमदार एकत्र येऊन तिसऱ्या आघाडीची स्थापना करतील, अशी चर्चा आहे. आमदार बच्चू कडू यांच्या प्रहारकडून निवडणूकीची तयारी केली जात आहे.

अजित पवारांवर टीका 

यात बच्चू कडू यांनी अजितदादांच्या आमदारांना लक्ष्य केलं आहे. ‘प्रत्येक आमदाराला मतदारसंघात निवडून येणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे अजित पवार यांचे आमदार विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटात जाऊन निवडणूक लढू शकतात, अशी परिस्थिती आहे. आमदाराला पक्ष फार महत्त्वाचा नसतो, त्याला फक्त निवडून यायचं असतं, असंही बच्चू कडू म्हणाले. ‘अजितदादांनी अशी उडी घेणं लोकांना पटलेलं नाही. भाजप आणि राष्ट्रवादीच्या विचारधारेमध्ये तफावत आहे,’ याचाही त्यांनी उल्लेख केला. त्यामुळे अजित पवारांच्या पक्षातील नाराज आमदारांना आणखी बळ देण्याचं काम बच्चू कडू यांनी दिले आहे, अशी चर्चा राजकारणात रंगली आहे.

Sanjay Gaikwad : जीभ छाटायची सोडा, केसाला जरी हात लावला तर 1 कोटी.. 

दोन्ही राष्ट्रवादी प्रचारात व्यस्त!

राज्यात लवकरच निवडणूक होणार असल्याने सर्वच पक्ष मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. एकीकडे अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. अजित पवार हे विविध विकासकामे आणि योजनांचा दाखला देत आमदारांना आपल्याकडे ठेऊन विधानसभेत उतरवणार आहेत. मात्र, काही आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. तर काही आमदारांना तिकीट कापले जाण्याची भीती असल्याने ते पर्याय शोधत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार हे स्वतः मैदानात उतरले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी सोलापूर दौरा केला. त्यानंतर पुन्हा कोल्हापूर दौऱ्यातही पक्षाची मोट बांधण्याचा प्रयत्न केला आहे. राजकीय गणितं जुळवत ते विविध मतदारसंघांचे दौरे करीत आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!