महाराष्ट्र

Bacchu Kadu : मुख्यमंत्र्यांचा गणपती करून समुद्रात टाकू

Prahar Janshakti Party : दोन आमदारांनीच विधानसभेत घाम फोडला

Maharashtra Assembly : आपल्या बेधडक वक्तव्याने नेहमी चर्चेत राहणारे प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. हिंगोली जिल्ह्यात आयोजित एका कार्यक्रमात बच्चू कडू म्हणाले दोन आमदार घेऊन फिरतोय तरी विधानसभेत घाम फोडल्याशिवाय राहत नाही. शेतकरी, शेत मुजरांच्या प्रश्नावर काम करतो. 15 ते 20 आमदार निवडून आले तर मुख्यमंत्र्याचा गणपती करु, उचलून नेऊन टाकू समुद्रात. त्यासाठी जनतेची साथ हवी आहे. आम्हाला जनतेचे आशीर्वाद पाहिजे, असे प्रहार जनशक्ती पार्टीचे नेते आमदार बच्चू कडू म्हणाले. सोमवारी (ता. 5) ते हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे बोलत होते.

लोकसभा निवडणुक संपली. आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यामुळे राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. निवडणुकीपूर्वी नेत्यांच्या विधानामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आपल्या अनोख्या स्टाइल आणि भाषणामुळे नेहमी राज्यभर चर्चेत राहणारे प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार बच्चू कडू यांचे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील भाषण सध्या चांगलेच गाजत आहे. या कार्यक्रमात बच्चू कडू म्हणाले, आपली लढाई ही कष्ट करणाऱ्यांसाठी आहे. एसटी महामंडळात (MSRTC) चालक असलेल्या व्यक्तीला 12 हजार रुपये दरमहा मिळतो. दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर माणसाला 25 हजार रुपये महिना मिळतात.

प्रचंड भेदभाव

जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनावरील चालक केवळ एका अधिकाऱ्याला घेऊन जातो. त्या अधिकाऱ्यालाही लाख रुपये पगार असतो. एसटीचा चालक 50 प्रवाशांना घेऊन जातो. त्याला मात्र केवळ 12 हजार रुपये मिळतात. त्यातही कपात केली जाते. हा पैसा कोणाच्या बापाचा आहे का? बच्चू कडू अजून जीवंत आहे. अशा शब्दात बच्चू कडू यांनी सरकारी यंत्रणेचा समाचार घेतला. भेदभाव करणाऱ्या अशा लोकांना उखडून फेकण्याची वेळ आली आहे. तुमचे बाथरुम पाच लाखांचे आणि आमचे घर सव्वा लाखाचे. लाज वाटत नाही का? हा असमतोल कोणी विचारात घेत नाही. जातीच्या नावावर निवडून येणारे बरेच जण आहेत, असेही बच्चू कडू यांनी सांगितले.

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीच्या संकेत दिले आहेत. मात्र बच्चू कडू म्हणाले, शिंदे सरकारकडे आमच्या 18 मागण्या आहेत. त्यांनी त्या जर पूर्ण केल्या तर आम्ही निवडणूकच लढणार नाही. आम्ही जातीय समीकरणे जोडून एकत्र येणार नाही. राजू शेट्टी, मनोज जरांगे पाअील, एमआयएमसोबत आमचे जे मुद्दे आहेत, त्यावरच एकत्र बसू. मागण्या मान्य झाल्या तर आम्ही बसणार नाही. वेळ आली तर आपण एकटे लढू. मात्र ज्या पक्षासोबत आमचे एकमत होईल, त्यांच्यासोबत आम्ही लढू. आमचे मुद्दे हे सर्व जातींमधील शेतकरी कष्टकरी मजुरांचे आहेत. आम्ही इतके मोठे नाही की प्रकाश आंबेडकरांना सोबत घेऊ किंवा त्यांच्यासोबत जाऊ. तो त्यांचा विषय आहे, असेही बच्चू कडू यावेळी बोलताना म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!