Prahar on BJP, Congress : देशात पक्षांचा राजकीय आतंकवाद वाढला आहे. जात आणि धर्म समोर आणल्याशिवाय निवडणूक जिंकता येत नाही. सध्या इतर पक्षांकडून धर्मा-धर्मात जातीच्या नावे विभागणी करायचे काम सुरू आहे. शेतकरी, शेतमजूर कष्टकऱ्यांना बाजूला केले गेले आहे. धर्माचे राजकारण मजबूत करण्याचे षडयंत्र सुरू आहे, अशी टीका बच्चू कडू यांनी केली. सांगलीच्या शिराळा येथे आयोजित सभेत ते बोलत होते.
राजू शेट्टी यांचा शेतकऱ्यांसाठीचा लढा हा अविरत आहे. खासदार राजू शेट्टी यांना पाठिंबा देण्यासाठी आपण आलो आहोत. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहोत. आमचे पहिले नाते शेतकऱ्यांसोबत आहे मग जात धर्म येवू शकतात. पहिल्यांदा शेतकरी म्हणून जगले पाहिजे. शेतकरी म्हणून मतदान केले पाहिजे. शेतकरी म्हणून उभे राहिले पाहिजे ही भूमिका आमची आहे. पण आता सगळे जण जात आणि धर्म सांगायला लागेल आहेत. कोणी हिंदू खतरे में हैं म्हणत आहे. कोणी मुस्लिम खतरे मेंhaiम्हणत आहे. किसान शेतकरी और मजदूर हा खतरे में हैं असे कोणी म्हणत नाही, अशी खंत कडू यांनी व्यक्त केली.
राजकीय दहशतवाद
देशात पक्षांचा राजकीय आतंकवाद वाढत चालला आहे. हा राजकीय दहशतवाद धोकादायक आहे. राजकीय पक्षांना जाती, धर्मांची काळजी आहे. परंतु त्यांना वाढलेल्या शेतकरी आत्महत्या दिसत नाहीत. शेतकऱ्यांच्या व्यथा आणि वेदना दिसत नाहीत. देशात कृषीप्रधान अर्थव्यवस्था असल्याचे सांगण्यात येते. शेतकरी या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. परंतु आजही शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. याचे कोणाला काहीच देणेघेणे नाही. वाढलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या कोणाला दिसत नाहीत, असा संतापही बच्चू कडू यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांचा वापर
अनेक राजकीय पक्षांनी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या नावावर राज्य केले. शेतकऱ्यांच्या समस्यांचे राजकारण करून आपली पोळी शेकली. मात्र शेतकऱ्यांच्या परिस्थितीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. आजही शेतकरी गरीबच आहे. शेतकऱ्यांची अवस्था दयनीयच आहे. त्यामुळे जाती-धर्माचे राजकारण करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या हिताचे राजकारण करा, असे आवाहन देखील बच्चू कडू यांनी केले. शेतकऱ्यांच्या हिताचा लढा देणाऱ्या लोकांच्या पाठीशी आपण राहू, असे ते म्हणाले.
देशातील शेतकरी सुखी झाला तर अनेक समस्या सुटतील. शेतकरी आणि कष्टकरी, श्रमिक यांचा जीवनस्तर उंचावणे काळाची गरज झाली असल्याचे प्रतिपादन आमदार बच्चू कडू यांनी केले. मात्र या गरीब वर्गाकडे काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांकडून प्रचंड दुर्लक्ष होत असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला.