Religion Politics : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी नुकतीच भेट घेतली. या भेटीनंतर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. धार्मिक क्षेत्रातील व्यक्ती राजकारणावर भाष्य करू लागल्याने आता राजकीय युद्धाला धर्माचा रंग चढला आहे. यासंदर्भात अयोध्येतील छावणी पिठाधीश्वर राजगुरू परमहंस आचार्य यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेले वक्तव्य पक्षपातीपणाचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना असे वक्तव्य करण्यासाठी मोठी दक्षिणा मिळाली असावी. त्यामुळेच त्यांनी अशी पक्षपाती भूमिका जाहीरपणे व्यक्त केल्याची टीका राजगुरू परमहंस आचार्य यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे दोन पक्षातील हा राजकीय वाद आता एकाच धर्मातील दोन धर्मगुरूंपर्यंत पोहोचला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत मोठा विश्वासघात झाल्याचे मत शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केले होते. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे हिंदू असूच शकत नाहीत, असेही शंकराचार्य म्हणाले होते.
ठाकरेंचे विचार जपले
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सिद्धांतावर चालणारे नेते आहेत. उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या लालसेपोटी बाळासाहेब ठाकरे यांच्या सिद्धांतांची साथ सोडली. त्यांनी काँग्रेससोबत (Congress) अभद्र युती केली. ‘काँग्रेससोबत युती करायची वेळ आली, तर मी माझे दुकान बंद करून टाकेल’ असे बाळासाहेब म्हणाले होते. त्यांच्या विचारांना आपल्या कृतीतून उद्धव यांनी तिलांजली दिली आहे. दुसरीकडे शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार टिकावे. यासाठी प्रसंगी सत्ता परिवर्तन करून राष्ट्रधर्माचे पालन केले. त्यामुळे तेच खरे राष्ट्रभक्त आहेत, असे मत जगद्गुरू परमहंस महाराज यांनी व्यक्त केले आहे.
शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यानंतर राज्यभरात त्याची चर्चा सुरू झाली होती. शिंदे हे हिंदू असूच शकत नाहीत, असे ते म्हणाले होते. आता परमहंस महाराज शिंदे यांच्या मदतीसाठी धावल्याने पुन्हा एकदा खरी शिवसेना कोणाची व खरा हिंदू कोण यावर दावे-प्रतिदावे रंगणार आहेत. लवकरच महाराष्ट्रात विधानसभा (Assembly Election) होणार आहेत. त्यामुळे सुरू झालेल्या या चर्चेमुळे निवडणूक प्रचारात हिंदुत्वाचे ‘कार्ड’ पुन्हा वापरले जाईल, यात दुमतच नसल्याचे सांगण्यात येत आहे. हिंदुत्वाच्या या पत्त्याचा कोणाला फायदा होतो, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.