Tumsar Mohadi APMC : कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसरच्या संचालक मंडळ निवडीसाठी आज मतदान झाले. मतदानाची टक्केवारी 97.10 आहे. 2024-2029 करीता प्रक्रिया सुरू आहे. सोमवारी 13 मे रोजी दिनानाथ मंगल कार्यालय तुमसर येथे मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विलास देशपांडे यांनी दिली आहे.
उत्कंठा संपली
तुमसर-मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची उत्कंठा संपली. रविवारी 12 मे रोजी 18 संचालक पदाकरिता मतदान झाले. या जागांसाठी तीन पट उमेदवार यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.सेवा सहकारी गटात तुमसर तालुक्यात 765 तर मोहाडी तालुक्यात 550 मतदार आहेत. ग्रामपंचायत गटात तुमसर तालुक्यात 97 ग्रामपंचायती असून मतदारांची संख्या 898 तर मोहाडी तालुक्यात 75 ग्रामपंचायतीत 677 मतदार आहेत.
अडते व व्यापारी गटात 502, हमाल मापारी गटात 201 मतदारसंख्या आहे.दरम्यान 97.10 टक्के मतदान झाल्याने बाजार समितीची निवडणूक चुरशीची ठरली आहे.
तीन पॅनलमध्ये लढत
विशेष म्हणजे आठवड्याभरात उमेदवारांनी दोन्ही तालुके पिंजून काढले. तालुक्यातील सेवा सहकारी संस्थांचे सदस्य, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अडते, हमाल व मापारी आदी मतदारांपर्यंत पोहोचण्यात उमेदवारांनी कुठलीच कसर ठेवली नाही.
आजी-माजी आमदारांचे वर्चस्व पणाला
शेतकरी विकास परिवर्तन पॅनल, जय किसान महाविकास पॅनल, बळीराजा जनहित पॅनल या प्रमुख तीन पॅनलचे नेतृत्व आजी-माजी आमदार करीत आहेत. सहकार क्षेत्रातील या निवडणुकीत कोण मुसंडी मारणार हे औत्सुक्याचे ठरणार आहे.
विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने बाजार समिती आपल्या हाती राखण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले आहे.तरअजित पवार गटाचे विद्यमान आमदार राजू कारेमोरे,आणि विकास फाउंडेशन चे माजी आमदार चरण वाघमारे यांच्यात थेट लढत झाली असल्याचे बोलले जात आहे. सोमवारी सकाळी 9 वाजेपासून दिनानाथ मंगल कार्यालय तुमसर येथे मतमोजणीला सुरूवात होईल. त्यामुळे विजयाचा गुलाल कुणाच्या गाली लागणार याची उत्सुकता आहे.