Mumbai : राज्यात भाजपाचे सरकार आल्यापासून कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली आहे. फडणवीसांकडे गृहमंत्रीपद आल्यापासून राज्यातील कायदा सुव्यवस्था दयनीय होत आहे. पुणे शहरात अल्पवयीन मुलाकडून मद्यधुंद अवस्थेत दोघांना पोर्शे कारखाली चिरडून मारले जाते. तसाच प्रकार जळगावात देखील घडतो. परंतु, त्याची चौकशी टाळण्यात येते. तर दुसरीकडे तहसीलदारावरच हल्ला होतो. राज्यातील जनतेला असुरक्षित वाटत आहे, अशा शब्दात काँगसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी टीका केली.
देवेंद्र फडणवीस हे 2014 पासून महाराष्ट्राला लाभलेले सर्वात निष्क्रिय आणि बेजबाबदार गृहमंत्री आहेत. इंदापूरच्या तहसीलदारांवर भरदिवसा समाजकंटकांद्वारे हल्ला केला जातो. असे प्रकार सातत्याने होत आहेत. गृहविभाग काय करत आहे? याचे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला द्यावे. राज्याचे गृहमंत्री जर कणखर असतील तर गुन्हेगारांना चाप बसतो. त्यांची गुन्हा करण्याची हिम्मतही होत नाही. परंतु, देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून गुन्हेगारांवर वचक बसण्याऐवजी त्यांचे मनोधैर्य वाढल्याचे दिसते. गुन्हे करण्याची हिंमत वाढत आहे. महाराष्ट्रातील जनतेला फडणवीसांच्या नेतृत्वात असुरक्षित वाटते. मात्र, फडणवीस या मुद्द्याला गांभीर्याने घेत नाहीत, असे अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.
असे विधान कसे करू शकतात
“गाडी खाली कुत्रा जरी आला तरी विरोधक राजीनामा मागतात”, अशा प्रकारचे बेजबाबदार विधान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस करतात. माणसे गाड्यांखाली चिरडली जात आहे. किड्या मुंग्यासारखी मारली जात आहेत. तरीही फडणीसांना त्याचे काहीच वाटत नसेल, तर अशा व्यक्तीने गृहमंत्र्याच्या खुर्चीवर बसावेच का ? गृहमंत्रीपद फडणवीसांना झेपत नसेल , तर त्यांनी गृहमंत्री पदाचा त्याग करावा. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री पद सांभाळू शकत नाही. हे त्यांच्या कार्यकाळातील घटना पाहून स्पष्ट दिसून येत आहे. पण वस्तुस्थितीचा स्विकार करणे फडणवीसांना मान्य नाही. असेही अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.
Subodh Saoji : माजी मंत्री सुबोध सावजी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल
… आता तरी जबाबदारी घ्या
कायदा सुव्यवस्थेबद्दल गहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनाच प्रश्न विचारणार. की आता त्यालाही पंडित जवाहरलाल नेहरुच जबाबदार आहेत? नेहरुच फडणवीसांना काम करु देत नाहीत का? असा खोचक टोलाही अतुल लोंढे यांनी फडणवीसांना लगावला आहे.