महाराष्ट्र

Legislative Council : आज होणार दूध का दूध पानी का पानी!

Political News : विधान परिषदेच्या फैसल्याकडे लागलेय लक्ष   

Mumbai : आमदार हॉटेलमध्ये बंद आहेत… काँग्रेसचे आमदार फुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे… काही लोक ऐनवेळी आपल्याच पक्षाला धोका देणार असल्याचे बोलले जात आहे… अश्या संपूर्ण परिस्थितीत आज विधान परिषदेचा फैसला झाल्यावरच दूध का दूध पानी का पानी होणार आहे.

भविष्य ठरणार 

राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीचं मतदान अवघ्या काही तासांवर आलंय. 11 जागांसाठी 12 उमेदवार असल्यानं एकाचा पराभव निश्चित आहे. गुप्त मतदान असल्यानं शरद पवारांची राष्ट्रवादी सोडून सर्वच पक्षांनी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलंय. मात्र मतदानाआधीच काँग्रेसचे 4 आमदार फुटणार, असा गौप्यस्फोट देखील काँग्रेसचेच आमदार कैलाश गोरंट्याल यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विधानसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना कोणत्या पक्षाचे आमदार फुटणार, कुणाचे आमदार स्वत:च्या पक्षाच्या विरोधात जाणार हे देखील आज त्यानिमित्ताने स्पष्ट होणार आहे. आज विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी गुप्त पद्धतीनं मतदान आहे.

विधानपरिषदेची निवडणूक ही विधानसभेसाठी उपांत्य फेरी मानली जात आहे. आज विधान परिषदेच्या ११ जागांसाठी मतदान होणार असून या साठी १२ उमेदवार रिंगणात असल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे, हे स्पष्ट आहे. आज एक उमेदवार पराभूत होणार असून तो कोणत्या पक्षाचा असेल, याबाबत उत्सुकता शिगेला गेली आहे. दरम्यान, आमदार फुटू नये यासाठी महायुतीने विशेष काळजी घेतली आहे. सर्व आमदारांना पाच वेगवेगळ्या पंचतारांकित हॉटेल्समध्ये ठेवण्यात आलं आहे.

लोकसभेतील आपल्या कामगिरीने सत्ताधारी पक्षांना चकित करणाऱ्या महाविकास आघाडीने आपले तीन उमेदवार उभे केले आहेत. पक्षाच्या राजकीय ताकदीचा विचार केला तर सध्याच्या संख्याबळानुसार काँग्रेसकडे 37 आमदार आहेत. आमदार गोरंट्यालच सांगतायत की, काँग्रेसची 4 मतं फुटणार. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसची 3 मतं अजित पवार फोडणार आहेत. कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या दुसऱ्या उमेदवाराला निवडून येण्यासाठी 3 मतांची गरज आहे. महायुतीचे 9 उमेदवार आणि महाविकास आघाडीचे 3 उमेदवार रिंगणात आहेत आणि महायुतीलाही नववा उमेदवार आणि महाविकास आघाडीला तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांची गरज आहे. त्यामुळं क्रॉस व्होटिंग अटळ आहे.

महायुतीकडे एकूण 197 मतं

भारतीय जनता पक्षाकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत उमेदवार आहेत. भाजपकडे स्वत:चे 103 आणि अपक्ष 8 अशी एकूण 111 मतं आहेत. शिंदेंच्या शिवसेनेकडून भावना गवळी आणि कृपाल तुमाने उमेदवार आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे 37 आमदार आणि अपक्ष 6 अशी 43 मतं आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जें निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे स्वत:चे 40 आणि इतर 3 असे 43 आमदार आहेत. महायुतीकडे एकूण 197 मतं आहेत, महायुतीचे 9 उमेदवार आहेत. 9 व्या उमेदवारांसाठी आणखी 10 मतं लागणार आहेत.

महाविकास आघाडीकडे 66 मतं

महाविकास आघाडीनं 3 उमेदवार दिले आहेत. काँग्रेसकडून प्रज्ञा सातव उमेदवार आहेत आणि काँग्रेसकडे 37 मतं आहेत. त्यामुळं सातवांचा विजय निश्चित आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर मैदानात असून ठाकरेंच्या शिवसेनेकडे शंकरराव गडाख या एका अपक्षांसह 16 मतं आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं शेकापच्या जयंत पाटलांना पाठींबा दिलाय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 12 आणि शेकापचा 1 आमदार अशी 13 मतं आहेत. महाविकास आघाडीकडे एकूण मतं आहेत 66 आणि विजयासाठी आवश्यक आहेत आणखी 3 मतं.

हॉटेल पॉलिटिक्स !

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या हॉटेल पॉलिटिक्स बघायला मिळत आहे. राज्यातील 4 मोठ्या पक्षांनी आपापल्या पक्षाचे आमदार मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवले आहेत. या सर्व आमदारांचा मुक्काम सध्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आहे.

Maratha Reservation : जरांगेंना कोण म्हणाले ‘लांडगा’?

कोणत्याही प्रकारचा दगाफटका होऊ नये यासाठी ही काळजी घेतली जात आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट या 4 पक्षांनी आपले आमदार वेगवेगळ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवले आहेत. फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने आपल्या आमदारांना कोणत्याही हॉटेलमध्ये एकत्र ठेवलेलं नाही, हे विशेष.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!