Panic Incident : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वाहनावर नागपूर जिल्ह्यात हल्ला करण्यात आला. काँग्रेसचे उमेदवार संतोष रावत यांनी चंद्रपूर जिल्ह्यात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही घटना ताज्या असतानाच भाजपचे आमदार प्रताप अडसड यांच्या बहिणीवर हल्ला झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील सातेफळ फाट्यावर सोमवारी (18 नोव्हेंबर) रात्री उशिरा हा हल्ला झाला. या हल्ल्यात त्या जखमी झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
प्रताप अडसड हे अमरावती जिल्ह्यातील भाजपचे आमदार आहेत. त्यांना भाजपने धामणगाव रेल्वे मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. अडसड यांची मोठी बहिण अर्चना रोठे या प्रचारासाठी फिरत होत्या. प्रचार आटोपल्यानंतर परत येत असताना सातेफळ फाट्यावर त्यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. रोठे यांच्या हात व पायाला गंभीर दुखापत झाले आहे. हल्लेखोरांनी वाहनावर दगडफे केल्यानंतर रोठे यांच्या एम. एच. 27 | डीबी 5001 क्रमांकाच्या वाहनाच्या काचही फुटल्या आहेत.
रुग्णालयात दाखल
हल्ल्यानंतर रोठे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आलेत. त्यानंतर पुढील उपचारासाठी रोठे यांना अमरावतीला हलविण्यात आले आहे. रोठे यांच्यावर हल्ला झाल्याचं कळल्यानंतर अडसड यांच्या समर्थकांनी पोलिस ठाण्यात गर्दी केली.
हल्लेखोरांनी रोठे यांची कार अडविली. अर्चना रोठे यांच्यावर चाकूहल्ला केला. वाहनाच्या काचही फोडल्या या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. रोठे यांच्या मानेवर चाकुनं वार करण्याचा प्रयत्न झाला. मानेवरचा वार हातावर लागला. त्यामुळं रोठे यांच्या हाताची नस कापली गेली आहे.
या प्रकरणी चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कार्यकर्त्यांनी घाबरू नये. कुठलाही गोंधळ घालू नये. विरोधकांनी रचलेला हा कट असू शकतो, अशी प्रतिक्रिया प्रताप अडसड यांनी व्यक्त केली. चांदूर रेल्वे पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
निवडणुकीचा प्रत्यक्ष प्रचार थांबल्यानंतर विदर्भात एकापाठोपाठ हल्ल्याच्या तीन घटना घडल्यानं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. पोलिसांपुढं या तीनही घटनांमुळं मोठं आव्हान निर्माण झालं आहे. अनिल देशमुख आणि अर्चना रोठे यांच्यावरील हल्लेखोर अज्ञात आहेत. त्यामुळं त्यांचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे. हल्ल्याच्या या घटनांमुळं सध्या विदर्भातील राजकारण तापलं आहे.