लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोदी लाट आहे, असे चित्र तयार करण्यात आले होते. त्याही परिस्थितीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे 31 खासदार निवडून आले. याचा धक्का त्यांना निश्चितच बसला. भ्रष्टाराचाराने कमावलेला पैसा राज्य सरकारकडे आहे. दिल्लीत बसलेले जे दोन नेते आहेत. त्यांचे एटीएम महाराष्ट्र आहे. विधानसभा निवडणुकीत मोदी, शाह यांचे एटीएम बंद केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.
त्यांच एटीएम महाराष्ट्र
मुंबई येथील षण्मुखानंद सभागृहात आज, शुक्रवारी (ता. 16) महाविकास आघाडीचा निर्धार मेळावा झाला. यावेळी नाना पटोले बोलत होते. ते म्हणाले, राज्यातला पैसा दिल्लीत बसलेले ‘हम दो हमारे दो’वाले घेऊन जात आहेत. राज्याला कंगाल करत आहेत. त्यांचं एटीएमच महाराष्ट्र आहे आणि आपलेच लोक आपला पैसा त्यांच्या घशात घालत आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचं एटीएम बंद करायचं आहे. हा पैसा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवायचा आहे.
महाविकास आघाडीच्या निर्धार मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी अर्थमंत्री जयंत पाटील, भाई जयंत पाटील, आदित्य ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड, सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.
Nana Patole : पटलेंच्या प्रवेशाने काँग्रेस अधिक मजबूत होणार !
भ्रष्ट, असैविधानिक सरकारच्या विरोधात आज नारळ फोडून प्रचाराची सुरूवात आपण करतो आहोत. महाराष्ट्रातील सध्याचं सरकार घाबरलेलं सरकार आहे. अगदी ज्याप्रमाणे दिल्लीतील सरकार घाबरलेलं आहे. रोज नवनवीन जीआर काढण्याचं काम करतात. आता महाराष्ट्रात विरोधकांना मोर्चेदेखील काढता येणार नाहीत. हुकुमशाहीकडे देशाची वाटचाल सुरू झाली आहे. सत्तेचा माज आलेली सरकार हे सर्व करत आहे, असे पटोले म्हणाले.
काल लाल किल्ल्यावरील भाषण ऐकत होतो. एकीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या आधारावर पंतप्रधान झालेले मोदी भाषण करतात. पण विरोधी पक्षनेत्याचंही लोकशाहीत तेवढंच महत्व आहे, हे ते सोयीस्करपणे विसरतात. लोकशाहीची दोन चाकं म्हणजे सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष आहे. विरोधी पक्षनेत्यांना बरोबरीचं स्थान आहे. ते स्थान राहुल गांधी यांना द्यायला पाहिजे होतं. पण त्यांना ते दिलं गेलं नाही. हा लोकशाहीवरचा हल्ला होता, खून होता. काल मोदी सरकार होतं. आज एनडीएचं सरकार आहे. पण अजूनही त्यांची घमेंड गेलेली दिसत नाही, असेही नाना पटोले म्हणाले.