Delhi : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी आतिशी मार्लेना निळ्या रंगाची साडी नेसून राजनिवास येथे पोहोचल्या. त्याचवेळी आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल देखील त्यांच्यासोबत राजभवनात आले. नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी आतिशी यांना मुख्यमंत्रीपद आणि गोपनियतेची शपथ दिली. आतिशी या स्वतंत्र भारतातील 17व्या महिला मुख्यमंत्री ठरल्या. दिल्लीतील सर्वांत तरुण मुख्यमंत्री म्हणूनही त्यांच्या नावाची नोंद झाली. शपथ घेतल्यानंतर त्या थेट केजरीवाल यांच्याकडे आल्या. त्यांच्या पायांना स्पर्श केला आणि आशीर्वाद घेतला. आतिशी यांच्यासाठी हा अत्यंत भावनिक क्षण होता.
भारतातील सध्याच्या सर्वांत तरुण मुख्यमंत्री
आतिशी मार्लेना या भारतातील सध्याच्या सर्वांत तरुण मुख्यमंत्री ठरल्या आहेत. वयाच्या 43 व्या वर्षी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली. त्या आम आदमी पार्टीच्या आघाडीच्या नेत्या आहेत. दिल्ली सरकारमधील बहुतांश विभागांची जबाबदारी सांभाळून त्यांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे. आमदार गोपाल राय, कैलाश गेहलोत, सौरभ भारद्वाज, इम्रान हुसेन आणि मुकेश अहलावत यांनीही यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळा साध्या पद्धतीने पार पडला. त्यात फक्त दिल्ली सरकारचे सचिव दर्जाचे अधिकारी सहभागी झाले होते. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह आम आदमी पक्षाचे प्रमुख नेते शपथविधीवेळी उपस्थित होते.
अशी झाली होती घोषणा..
कथित मद्य धोरण घोटाळ्यात सर्वोच्च न्यायालयातून केजरीवाल यांना जामीन मिळाला. 15 सप्टेंबरला केजरीवाल आम आदमी पार्टीच्या मुख्यालयात पोहोचले होते. त्यानंतर केजरीवाल यांनी दोन दिवसांनी राजीनामा देण्याची घोषणा केली. जोपर्यंत जनता माझ्या प्रामाणिकपणावर शिक्कामोर्तब करत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही, असे ते म्हणाले होते. मी प्रत्येक घरा-घरात जाईन आणि जनतेचा निर्णय येईपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही. त्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी आतिशी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आतिशी यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेण्यात आला.
राजकीय प्रवास
मुख्यमंत्री होण्यापूर्वी आतिशी यांच्याकडे वित्त, महसूल, पीडब्ल्यूडी, वीज आणि शिक्षण यासह 13 खाती होती. आतिशी यांनी 2013 मध्ये आम आदमी पार्टीमधून राजकीय प्रवास सुरू केला. जुलै 2015 ते एप्रिल 2018 पर्यंत त्या मनीष सिसोदिया यांच्या सल्लागार होत्या. यानंतर, 2019 मध्ये आतिशीने पूर्व दिल्लीच्या जागेवरून लोकसभा निवडणूक लढवली पण त्यांचा गौतम गंभीरकडून पराभव झाला.मात्र, 2020 च्या विधानसभा निवडणुकीत आतिशी यांनी कालकाजी मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणूक जिंकून आमदार झाल्या.9 मार्च 2023 रोजी आतिशी दिल्लीच्या आदमी पक्षाच्या सरकार मध्ये पहिल्यांदा मंत्री बनल्या. त्या आम आदमी पक्षाच्या सर्वात बोलत्या प्रवक्त्या मानल्या जातात. वाढीव बजेट वाटप, शिक्षक प्रशिक्षण सुधारणा, मोफत संसाधनांची तरतूद, एकाधिक पोर्टफोलिओ हाताळणे, विद्यार्थी हक्कांसाठी वकिली, क्रायसिस मॅनेजमेंट, दिल्लीतील पाणीटंचाई, या सर्व विषयांवर त्यांनी आपली भूमिका बजावली.
कोण आहेत आतिशी?
आतिशी या पंजाबी कुटुंबातील आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण दिल्लीत झाले. आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवीधर आहेत. शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करण्यासाठी त्यांची ओळख आहे. दिल्लीच्या सरकारी शाळांच्या सुधारणेचे सर्वात मोठे श्रेय आतिशी यांना दिले जाते. त्या आपच्या राजकीय व्यवहार समितीच्या सदस्याही आहेत.