Raj Bhavan Nagpur : उपराजधानी नागपूरमध्ये 33 वर्षांनंतर झालेल्या शपथविधीमध्ये इंद्रनील नाईक आणि अशोक उईके यांचा समावेश होता. यासंदर्भात ‘द लोकहित’ने अत्यंत जबाबदारीने आणि ठामपणे वृत्त प्रकाशित केले होते. यवतमाळ जिल्ह्यातील पुसदच्या बंगल्याला मंत्रीपद मिळणार, हे जवळपास निश्चित होते. विधानसभा निवडणुकीमध्ये राज्याला दोन मुख्यमंत्री देणाऱ्या नाईक यांच्या बंगल्यामध्ये फूट पडली होती. इंद्रनील नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून निवडणूक लढवली. त्यांचेच सख्खे भाऊ ययाती नाईक हे देखील निवडणूक रिंगणात उतरले होते.
शरद पवार यांनी पुसदच्या या बंगल्यामध्ये फूट पाडली होती. मात्र ही फूट दूर करण्यामध्ये मनोहर नाईक यांना यश आले होते. त्यामुळे इंद्रनील नाईक हे विधानसभा निवडणुकीत विजयी झालेत. यवतमाळ जिल्ह्यातून संजय राठोड यांच्या नावाला शिवसेनेकडून विरोध सुरू झाला. यावेळीच इंद्रनील नाईक यांचे नाव मंत्री पदासाठी चर्चेत आले. याशिवाय यवतमाळ जिल्ह्यातून भाजपला एक मंत्रीपद द्यायचे होते. त्यामुळे मदन येरावार यांच्या ऐवजी अशोक उईके यांच्या नावाचा विचार होईल, असे ‘द लोकहित’ने नमूद केले होते. हे वृत्त खरे ठरले आहे.
यवतमाळला लॉटरी
डॉ. अशोक उईके यांना निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळेल हे वृत्त देखील सर्वांत पहिले ‘द लोकहित’नेच प्रकाशित केले होते. हे वृत्त देखील खरे ठरले होते. आता त्यांच्याकडे मंत्रिपदाची जबाबदारी आली आहे. राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये यवतमाळ जिल्ह्याला लॉटरी लागली आहे. यवतमाळ जिल्ह्यातून संजय राठोड, अशोक उईके यांना कॅबिनेट मंत्री पद मिळाले. इंद्रनील लाईक यांना राज्य मंत्रिपद देण्यात आले आहे. त्यामुळे कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये यवतमाळचे वजन वाढले आहे.
नागपूर जिल्ह्यानंतर यवतमाळमध्येही मंत्री पदांची संख्या जास्त आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरचे आहेत. याशिवाय चंद्रशेखर बावनकुळे हे देखील कामठी अर्थातच नागपूर जिल्ह्यातील आहेत. शिवसेनेचे आशिष जयस्वाल हे रामटेकचे आमदार आहेत. हा मतदारसंघ देखील नागपूर जिल्ह्यात आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्याला देखील दोन कॅबिनेट आणि एक राज्य मंत्रिपद मिळाली आहे.
अनेक जिल्हे वंचित
मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये विदर्भातील अनेक जिल्हे वंचित राहिले आहेत. अकोला आणि अमरावतीला कोणतेही मंत्री पद मिळालेले नाही. यवतमाळमध्ये तीन मंत्री आहेत. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील पालकमंत्री पदही यवतमाळ मधील एखाद्या नेत्याला मिळू शकते. चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यालाही मंत्रिपद मिळालेले नाही. वर्धा जिल्ह्याला मात्र यंदा पंकज भोयर यांच्या रूपाने मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. त्यामुळे महायुतीच्या सरकारने जिल्ह्यांमधील मंत्रिपदाचे संतुलन राखण्याचे प्रयत्न केल्याचे दिसत आहे. मात्र अकोला जिल्हा पुन्हा एकदा मंत्रिपदापासून वंचित राहिला आहे.