महाराष्ट्र

Shrijaya Chavan : माजी मुख्यमंत्र्यांची लेक विधानसभेच्या रिंगणात?

Assembly Elections : श्रीजया अशोक चव्हाणने केली तयारी; वडील म्हणतात, ‘स्वतः प्रयत्न करावे’

भाजपचे राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया यांनी विधानसभेसाठी रणशिंग फुंकल आहे. श्रीजया चव्हाण या राजकारणात चांगल्याच सक्रिय झाल्याचे दिसत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतच श्रीजया यांची सक्रीयता बघायला मिळाली. मात्र, आता त्यांचे वडिल अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रेवश केला आहे. यामुळे श्रीजया आता भोकर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उम्मेदवार म्हणून पुढे येणार असल्याचे समजते.

वर्षभरापासून काँग्रेसच्या भारत जोडो अभियानात श्रीजया अशोक चव्हाण या सहभागी झाल्या होत्या. पहिल्यांदाच भारत जोडो अभियानाच्या राहुल गांधी यांच्या स्वागताच्या प्रत्येक बॅनरवर श्रीजयाचा फोटो झळकले होते. श्रीजया चव्हाण आगामी विधानसभा निवडणुक लढविणार असल्याची चर्चा रंगली होती. केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या नंतर त्यांचे पुत्र अशोक चव्हाण यांनी राजकीय वारसा चालवला. आता श्रीजया चव्हाण राजकारणात अधिक सक्रिय झाल्याचे दिसत आहे. त्या अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्या पत्नी माजी आमदार अमिता चव्हाण आणि मुलगी श्रीजया चव्हाण यांना काही दिवसांपूर्वी मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं.

राज्यात लवकरच विधानसभेची निवडणूक जाहीर होणार आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. त्यादृष्टीने उमेदवारांची चाचपणी देखील केली जात आहे. अशातच आता या निवडणुकीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांना भाजपाकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत आता अशोक चव्हाण यांनी देखील भाष्य केलं आहे. ‘तिची इच्छा असेल तर तिने उमेदवारीसाठी प्रयत्न करावे, मी यात कोणताही हस्तक्षेप करणार नाही’, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

श्रीजया चव्हाण काय म्हणाल्या

“मी नवीन आहे मला साथ द्या. माझे आजी-आजोबा, आई-बाबा यांना तुम्ही साथ दिली. आता मला ही द्या”, असं म्हणत भाजप नेते अशोक चव्हाण यांची लेक श्रीजया चव्हाण यांनी नांदेडमधील मतदारांना साद घातली आहे. काल भोकर तालुक्यातील पिंपळढव येथे गिरीश महाजन यांच्या हस्ते अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तसेच महायुती सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी श्रीजया चव्हाण बोलत होत्या.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!