BJP Congress : राजकारणाच्या रणांगणात कुणीही मित्र नसतो. सख्खा भाऊ विरोधात उभा ठाकलेला असला तरीही तो विरोधकच मानला जातो. आजवर राजकारणात अशी अनेक उदाहरणे आपण बघितली आहेत. अगदी ताजे उदाहरण घ्यायचे झाले बारामतीमधील घेता येईल. याठिकाणी अजित पवार यांच्या विरोधात त्यांचा पुतण्या युगेंद्र पवार उभा आहे. कुणीही निवडून आले तरीही सत्ता कुटुंबातच असेल. पण प्रचारात मात्र एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याशिवाय पर्याय नसतो. तसाच अनुभव नागपूर जिल्ह्यात सावनेर मतदारसंघामध्ये येणार आहे.
सावनेर मध्ये लढत
सावनेर विधानसभा मतदारसंघात यंदा दोन मोठे उलटफेर झाले. याठिकाणी सुनील केदार पाच टर्मचे आमदार आहेत. ते राज्यात मंत्रीही होते. पण जिल्हा सहकारी बँकेतील घोटाळ्यात त्यांना अटक झाली आणि त्यानंतर गणीत बिघडले. आता ते निवडणुकीच्या रिंगणात नाहीत. त्यांच्याऐवजी पत्नी अनुजा केदार निवडणूक लढवत आहेत. दुसरा बदल म्हणजे काटोलसाठी इच्छुक असलेले डॉ. आशीष देशमुख यांना भाजपने सावनेरमध्ये पाठवले आहे. आता अनुजा केदार यांच्याविरोधात ते लढणार आहेत. पण त्यांच्याविरोधात त्यांचे सख्खे बंधू डॉ. अमोल देशमुख देखील रिंगणात आहेत.
2014 मध्ये माजी मंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात आशीष देशमुख भाजपच्या तिकिटावर काटोलमधून लढले होते. ते विजयी देखील झाले. मात्र काका-पुतण्यांमधील ही लढत राज्यभर गाजली होती. जवळपास सहा हजारांनी विजय मिळविण्यात त्यांना यश आलं होतं. या निवडणुकीनंतर आशीष देशमुख यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. त्यामुळे 2019 मध्ये काटोल सोडून दक्षिण-पश्चिमकडे त्यांनी आपला मोर्चा वळवला. आता ते पुन्हा भाजपमध्ये आले. त्यांना पुन्हा एकदा काकांच्या विरोधात लढायचे होते. मात्र, त्यांना सावनेरला पाठवण्यात आले.
सावनेरमधून लढण्यासाठी डॉ. अमोल देशमुख आधीपासून तयार होते. काँग्रेसकडून तिकीट मिळविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पण, केदारांचे वर्चस्व असल्यामुळे ते शक्य झाले नाही. त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यामुळे आता देशमुख विरुद्ध देशमुख विरुद्ध केदार असा सामना सावनेरमध्ये बघायला मिळणार आहे. दोन सख्खे भाऊ मैदानात उतरल्यामुळे मतांचे विभाजन कसे होणार, हे 23 नोव्हेंबरलाच कळणार आहे. यापूर्वी 2014 मध्ये अमोल देशमुख यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर रामटेकमध्ये नशीब आजमावले होते.
Devendra Fadnavis : मुस्लीम मतांसाठी ‘हिंदूहृदयसम्राट’ म्हणणे बंद केले
देशमुखांच्या घरात दोन पक्ष, एक अपक्ष!
राज्याचे माजी कृषीमंत्री रणजित देशमुख यांच्या घरात आता दोन पक्ष आणि एक अपक्ष असे चित्र आहे. रणजित देशमुख काँग्रेसचे नेते आहेत. आशीष देशमुख भाजपचे, तर अमोल देशमुख आता अपक्ष लढत आहेत. रणजित देशमुख यांची दोन्ही मुले एकमेकांच्या विरोधात लढत आहेत की काँग्रेसला धक्का देण्यासाठी लढत आहेत, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. अमोल देशमुख यांच्यामुळे काँग्रेसला मिळणाऱ्या मतांचे विभाजन झाले तर आशीष यांना फायदा होऊ शकतो, असाही तर्क लावला जात आहे.