Bhandara District : निवडणुकीची कामे संपताच शिक्षकांवर अजून एका कामाचे टेंशन आले आहे. विद्यार्थ्यांची पटसंख्या कायम ठेवण्यासाठी विद्यार्थी शोध मोहीम सुरू केली आहे. पुन्हा एक कामाचे भूत शिक्षकांच्या मानगुटीवर बसले आहे.घरोघरी जाऊन ताई तुमचा मुलगा किती वर्षाचा हो! अशी विचापूस करताना दिसत आहेत. भर उन्हात शिक्षकांची वणवण पाहायला मिळत आहे.
राज्य शासनाच्या 5 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी संचमान्यतेचे नवीन निकष लागू करण्यात आले आहेत. हे निकष 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून अंमलात येणार आहेत.या निकषात इयत्ता सहावी ते आठवीमध्ये दोन वर्ग असल्यास 70 पटसंख्येपर्यंत दोन शिक्षक आणि त्यापुढे 88 पटसंख्येनंतर तिसरा शिक्षक मान्य होणार आहे. त्यानंतर शिक्षक मान्य करण्यासाठी प्रत्येकी 34 विद्यार्थ्यांमागे शिक्षक मिळणार आहे.
इयत्ता सहावी ते आठवीसाठी नवीन शिक्षक पात्र होण्यास किमान संख्येपेक्षा 18 विद्यार्थ्यांची पटसंख्या असणे आवश्यक आहे. मुख्याध्यापक पद पात्र होण्यासाठी इयत्ता पहिली ते पाचवी किंवा इयत्ता पहिली ते सातवी, आठवीची पटसंख्या किमान 150 असावी लागणार आहे.त्यामुळे बहुतांश शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निर्णयाने शिक्षकांचे टेन्शन वाढल्याचे दिसून येत आहे.संच टिकविण्यासाठी निवडणुकीचे कामे आटपुन शिक्षकांची गावागावांत भटकंती सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
अलिकडे इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे विद्यार्थी व पालकांचा कल वाढला आहे. अशातच मराठी शाळांसाठी शासनाच्या संचमान्यतेच्या शासन निर्णयामधील बऱ्याच अटी शर्ती असून, त्या जाचक ठरत आहेत. या निकषांचा विचार केल्यास वर्ष या वर्षी पासून शिक्षक संख्या मान्यतेचे प्रमाण कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नवीन शिक्षक भरतीवर परिणाम
नवीन संच मान्यतेचा परिणाम यंदाच्या शिक्षक भरतीवर होण्याची शक्यता दिसत आहे. विद्यार्थी असेल तरच शिक्षकांची गरज भागवली जाणार आहे. मात्र ज्या पद्धतीने इंग्रजी शाळेचे महत्त्व पालकांमध्ये वाढले आहे. त्यामुळे आता या नवीन शिक्षकांना आपला स्तर वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे.अन्यथा शासन यंदा सुद्धा शिक्षक भरती करेल याची शक्यता ही कमी वाटत आहे.