Railway Project : सुमारे 115 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या खामगाव-जालना रेल्वे मार्गाबद्दल अद्यापही यशस्वी तोडगा निघालेला नाही. पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी या रेल्वे मार्गासाठी खामगावकरांना शब्द दिला होता. मात्र आजही हा रेल्वे मार्ग पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे यंदा खामगाव विधानसभा मतदारसंघात भाजपला मतदार या रेल्वे मार्गाचे काय झाले? असा प्रश्न विचारत आहेत. तब्बल दहा वर्षांच्या खंडानंतर काँग्रेसचे उमेदवार दिलीपकुमार सानंदा पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. आकाश फुंडकर यांना आव्हान देण्यासाठी सानंदा यांनी तयारी केली आहे. परंतु दहा वर्ष निवडणुकीपासून दूर राहिल्याने त्यांच्यासाठी देखील विजयाचा मार्ग सोपा नसेल.
काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख असेपर्यंत दिलीपकुमार सानंदा यांची बऱ्यापैकी चलती होती. खामगावला सानंदा यांच्याशिवाय दुसरे नाव ठाऊक नव्हते. परंतु देशमुख यांच्या निधनानंतर सानंदा यांना काँग्रेसने ‘साइड ट्रॅक’ करण्यास सुरुवात केली. सानंदा यांचा ईव्हीएमवर विश्वास नव्हता, त्यामुळे त्यांनी निवडणूक लढवली नाही असे ते सांगतात. परंतु निवडणूक न लढवण्यामागील कारणे अनेक असू शकतात असे सांगितले जात आहे. अशातच केंद्रामध्ये मोदी सरकारची ही तिसरी टर्म आहे. परंतु दहा वर्षात खामगाव ते जालना या रेल्वे मार्गाचे फारसे काही झाले नाही असे आता मतदार बोलत आहेत.
विकासाचे काय?
एकूणच विकासाच्या बाबतीत बुलढाणा जिल्हा अद्यापही मागासलेला आहे. घाटाखालील खामगाव, मलकापूर हे दोन मतदारसंघ राष्ट्रीय महामार्गावर आहेत. त्यातल्या त्यात खामगाव हे व्यापाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र आहे. कापसाची मोठी बाजारपेठ खामगावात आहे. याशिवाय चांदीच्या व्यवसायाच्या बाबतीत खामगावचे नाव प्रसिद्ध आहे. पांढरे सोने आणि चांदी यांच्या व्यापारामुळे खामगावला ‘सिल्वर सिटी’ असेही संबोधले जाते. परंतु खामगावचा पाहिजे तसा विकास झाला का? असा प्रश्न आता काँग्रेसकडून विचारला जात आहे. तर आमदार आकाश फुंडकर यांनी किती कामे केली याची यादी भाजपकडून वाचून दाखवली जात आहे.
काँग्रेस आणि भाजपचा विरोधकांकडून खामगाव-जालना रेल्वे मार्गाचा प्रश्न प्रचारासाठी वापरला जात आहे. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली. ‘खामगाव जालना रेल्वे मार्ग चाहिये की नही चाहिये?’ अशी साद घालत मोदींनी मतदारांना आकर्षित केले. यावेळी देशभरामध्ये मोदी लाट होती. केंद्रामध्ये बहुमताचे सरकार होते. नरेंद्र मोदी नावाची ‘क्रेझ’ होती. त्यामुळे खामगाव मतदारसंघातील नागरिकांनी भाजपला भरभरून मतदान केले. परंतु आता दहा वर्षे झाली तरी खामगाव ते जालना लोहमार्ग सुरू झाला नाही. ही केवळ ‘जुमलेबाजी’ होती, असा प्रचार आता काँग्रेसकडून केला जात आहे. काँग्रेसच्या या सर्व आरोपांना भाजपकडून कशी टक्कर दिली जाते, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.