Akola Constituency : ‘द लोकहित’ने अत्यंत ठामपणे प्रकाशित केलेल्या वृत्तानुसारच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अकोल्यात हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घालत मतदारांना भावनिक साद घातली. भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी (ता. 23) शाह यांनी अकोला शहरातील क्रिकेट क्लब मैदानावर सभेला संबोधित केले. अवकाळी पावसाचे सावट असलेल्या या सभेला उदंड प्रतिसाद मिळाला.
अकोल्यातील सभेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोणकोणत्या मुद्द्यावर बोलणार याबाबत ‘द लोकहित’ने यापूर्वी वृत्त प्रकाशित करत सविस्तर माहिती दिली होती. त्यानुसारच अमित शाह यांनी हिंदुत्व, राम मंदिर, ट्रिपल तलाक आणि उद्धव ठाकरे यांच्यावरील टीकेच्या माध्यमातून मतदारांना अनुप धोत्रे यांना विजयी करण्याचे आवाहन केले. जय श्रीराम घोषणेपासून त्यांनी भाषणाला सुरुवात केली. नरेंद्र मोदी यांच्यामुळेच अयोध्येत श्रीराम मंदिर झाले, असे अमित शाह यांनी स्पष्टपणे नमूद केले. जम्मू काश्मीरातून कलम 370 नरेंद्र मोदी यांनी हटवले. ट्रिपल तलाक संदर्भातील कायदा ही नरेंद्र मोदी यांनीच आणला, असे शाह म्हणाले.
Lok Sabha Electiion : मोटाभाई अकोल्यात घालणार हिंदुत्वाच्या मुद्द्यांना हात
समान नागरी कायदा येणार
अमित शाह यांनी सांगितले की, देशात समान नागरी कायदा आणि सीएए कायदा काहीही झाले तरी लागू होणार आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशावरही अमित शाह यांनी टीका केली. या देशांमध्ये आतापर्यंत हिंदू अल्पसंख्यांक मुलींचा बळजबरी निकाह केला जात आहे, असे शाह म्हणाले.
उद्धव तर कामाचे नाही
अकोल्यातून अमित शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत न बोललेले बरे आहे. त्यांना केवळ आपल्या मुलाला मंत्री करायचे आहे, अशी टीका त्यांनी केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने देशासाठी काहीही केले नाही. महाराष्ट्रासाठी अत्यंत कमी निधी दिला. याउलट भाजपच्या सरकारने विदर्भासाठी सर्वाधिक निधी दिला, असा दावा शाह यांनी केला.
आरक्षण कायम राहणार
भारतीय संविधानानुसार अनेक जातींना आरक्षण मिळाले आहे. या आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही. विरोधकांजवळ कोणतेही मुद्दे बोलण्यासाठी नाहीत. त्यामुळे ते दलित आणि आदिवासी समाजाची दिशाभूल करीत आहेत. नरेंद्र मोदी दोनदा पंतप्रधान झालेत. आजही पूर्ण बहुमताचे सरकार देशात आहे. परंतु नरेंद्र मोदी यांनी बहुमताचा वापर अशा प्रकारांसाठी केला नाही, असे शाह म्हणाले.