लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळविले. पण, तरीही जिथे पराभव झाला, तिथे झाडाझडती घ्यायला सुरुवात झाली आहे. उबाठा गटाचे नेते अरविंद सावंत यांनी बुलढाण्यातील पराभव ‘मातोश्री’ची फसवणुक आहे, अशी थेट नाराजी व्यक्त केली आहे. एवढेच नव्हे तर आढावा बैठकीत त्यांनी पदाधिकाऱ्यांना खडेबोल देखील सुनावले.
बुलढाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांचा पराभव झाला. उमेदवारी मिळविताना खेडेकरांसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उत्साह दाखवला आणि आता पराभवाची कारणं देत आहेत. यावरून शिवसेना नेते अरविंद सावंत भडकले. त्यांनी पदाधिकाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावले.
‘शिवसैनिक खरं बोलणारा असतो, मात्र तुम्ही माझ्याशी खोटं बोललात. तुमच्याविषयी मातोश्रीवर रक्ताने लिहिलेली पत्रं आलीत. तरीही तुम्ही दिशाभूल केली. आमची आणि अप्रत्यक्षरित्या ‘मातोश्री’ची फसवणुक केलीत, या शब्दांत सावंत यांनी नाराजी व्यक्त केली.
उबाठा गटाचे विभागीय नेते अरविंद सावंत यांनी दोन दिवसांपूर्वी अकोल्यात बैठक घेतली. यात पश्चिम विदर्भाचे नेते उपस्थित होते. बैठकीनंतर बंददार चर्चा झाली. यात पराभवावरून सावंत यांनी जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांना सुनावले. ‘रविकांत तुपकर ५० हजार मतांच्या वर जाणार नाहीत असे तुम्ही मला सांगितले. आता त्यांच्यामुळेच पराभव झाल्याचे सांगता. मशाल चिन्ह नवे होते. तर मग तुपकरांचा ‘पाना’ घराघरांत पोहचला आणि ‘मशाल’ का नाही? असा सवालच अरविंद सावंत यांनी केला.
तुम्ही खोटं बोललात!
शिवसैनिक हा खरं बोलणारा असतो. तुम्ही शिवसैनिक म्हणून जगत असाल तर निवडून येणाऱ्या उमेदवाराला पुढे करायला हवे होते. पण, तुम्ही माझ्यासोबत खोटं बोललात, अशी नाराजी सावंत यांनी व्यक्त केली.
‘वन टू वन’ चर्चा
बुलडाणा पदाधिकाऱ्यांसोबत सावंत यांनी ‘वन टू चर्चा’ चर्चा केली. त्यापूर्वी जाहीर बैठकीला संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत, सहसंपर्क प्रमुख छगन मेहत्रे, वसंतराव भोजने, दत्ता पाटील उपस्थित होते. यावेळी अरविंद सावंत यांनी परभवावरून चांगलेच झापले. ‘उमेदवार घोषित होण्याआधी आम्हाला चिठ्ठ्या मिळत होत्या. मातोश्रीवर रक्ताने लिहिलेली पत्रं आलीत. मात्र तरीही तुम्ही दिशाभूल केलीॉ. मला फसवले आणि अप्रत्यक्षरीत्या ‘मातोश्री’चीही फसवणुक केलीत,’ या शब्दांत त्यांनी सुनावनले.
म्हणे तुपकरांमुळे पराभव झाला
पराभवावर चर्चा करताना सुरुवातीला पदाधिकाऱ्यांनी मशाल चिन्ह नवे असल्याचे कारण सांगितले. त्याचा संदर्भ घेत सावंत चांगलेच संतापले. ‘पाना’ घराघरांत पोहचला मग मशाल का नाही? असा सवाल करीत सावंत यांनी बुलडाण्याच्या पदाधिकाऱ्यांना निरुत्तर केले. आता लोकसभा निवडणुकीत तुपकरांमुळे पराभव झाल्याचे सांगता विधानसभा निवडणुकीतही तेच सांगाल? असा सवालही सावंत यांनी केल्याचे सूत्रांनी सांगितले.