Political News : राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी अरविंद केजरीवाल यांच्याकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. पुढील दोन दिवसांत मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहे, असे केजरीवाल म्हणाले आहेत. केजरीवाल यांच्या या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावेळी केजरीवाल यांनी असेही म्हटले की, मी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकी सोबतच दिल्लीच्या निवडणुका देखील घेण्यात याव्या.
काय म्हणाले केजरीवाल?
अरविंद केजरीवाल पुढे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने काही अटी घातल्या आहेत. त्यामुळे मला कुठल्याही प्रकारचे काम करता येणार नाही अशी चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारने मागच्या काही वर्षांत काय कमी अटी घातल्या होत्या का? केंद्र सरकारने फक्त कायदेच आणले. कायदे आणून आमची शक्ती कमी करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला, असा आरोपही अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. पुढच्या दोन दिवसांत मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहे. त्यानंतर मी आणि मनिष सिसोदिया आम्ही दोघेही दिल्लीच्या जनतेत जाऊन त्यांच्याशी काही मुद्द्यांवर संवाद साधणार आहोत. दिल्लीतील लोकांना आम्ही प्रामाणिक वाटलो तर ते आम्हाला नक्की विजयी करतील,’ असा विश्वास अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला.
दोन दिवसांत आम आदमी पार्टीच्या विधिमंडळ सदस्यांची बैठक होणार. मी राजीनामा दिल्यानंतर त्या बैठकीमध्ये आम आदमी पार्टीमधील दुसऱ्या नेत्याची मुख्यमंत्रिपदी निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर जोपर्यंत दिल्लीच्या जनतेचा निर्णय येत नाही, तोपर्यंत मी पुन्हा मुख्यमंत्रिपद स्वीकारणार नाही. मी आणि मनीष सिसोदिया तेव्हाच पदभार स्वीकारणार जेव्हा दिल्लीतील नागरिक आम्हाला पुन्हा निवडून देतील. जनतेला जर मी प्रामाणिक वाटत असेल तरच दिल्लीच्या जनतेने मला निवडून द्यावे. अन्यथा जनतेने मला निवडून देऊ नये, असेही अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे.
Arvind Kejriwal : 177 दिवसांनंतर केजरीवाल सुटले; अकोल्यात जल्लोष
सहानूभुतीचा फायदा होऊ शकतो
केजरीवाल यांना दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहानूभुती देखील मिळू शकते. त्यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. लिकर पॉलिसी मधील घोटाळ्यासाठी केजरीवाल यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे केजरीवाल यांच्यावरील जनतेचा विश्वास पूर्णपणे उडाला आहे, असे सत्ताधारी पक्षाला वाटणे स्वाभाविक आहे. पण या अटकेचे उलट परिणाम होऊन केजरीवाल यांच्याबद्दल सहानूभुती वाढण्याची शक्यताही नाकारता येणार नाही.