Dispute In Party : विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस मधील गणित बिघडताना दिसत आहे. प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांना पुन्हा एकदा विरोध सुरू झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी हिरो ठरलेले नाना पटोले आता अनेकांना आता ‘व्हिलन’ वाटू लागले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्याचा विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे.
वडेट्टीवार यांच्यापूर्वीच काँग्रेसचे नेते ऋषिकेश उर्फ बंटी शेळके यांनी आमदार नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले होते. नाना पटोले हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीचे हस्तक आहेत, असा आरोप शेळके यांनी केला होता. मुंबईमध्ये काँग्रेसची बैठक सुरू असताना पक्ष कार्यालयाबाहेर यांनी पत्रकारांजवळ हा आरोप केला होता. त्यानंतर नागपूर मध्ये बंटी शेळके यांनी काँग्रेसच्या कार्यालयात बैठक घेण्याचा प्रयत्न केला.
बंटी शेळके यांच्या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोध केला. नागपुरातील काँग्रेसचे कार्यालय देवडिया भवन कुलूप बंद करण्यात आले. त्यामुळे बंटी शेळके यांनी देवडिया भवनच्या बाहेर असलेल्या फूटपाटवर काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. आता हा वाद काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासमोर रंगण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेस नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक नागपूर येथे मंगळवारी (17 डिसेंबर) होत आहे. या बैठकीमध्ये नाना पटोले यांना घेण्याची तयारी अनेकांनी चालवली आहे.
वादाची शक्यता
प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांना घेण्यासाठी काँग्रेसमधील अनेक नेते सज्ज झाले आहेत. यामध्ये मध्य नागपुर विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेले उमेदवार ऋषिकेश उर्फ बंटी शेळके यांचाही समावेश आहे. सध्या शेळके यांचा नाना पटोले यांच्याशी ‘कोल्ड वॉर’ सुरू आहे. काँग्रेस प्रभारींसमोर हा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंटी शेळके आणि त्यांच्या समर्थकांना बैठकीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
रमेश चेन्नीथला यांच्यासमोर नाना पटोले यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर आवाज बुलंद होण्याची दाट शक्यता आहे. महत्त्वाच्या जागा नाना पटोले यांनी मित्र पक्षांना दिल्याचा आरोप आहे. जागा वाटप करण्यापूर्वीच शिवसेना आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले होते. शिवसेनेकडून नाना पटोले यांची तक्रारही करण्यात आली होती. पटोले येणार असतील तर आम्ही जागा वाटपाच्या बैठकीला येणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती.
नेत्यांचा वाद
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या नाव निश्चितीवरूनही काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये वाद झाला होता. एका नेत्याने काँग्रेसचे माजी मंत्री अजहर हुसेन यांचे सुपुत्र डॉ. झिशान हुसेन यांचे नाव पुढे केले होते. तर दुसरीकडून साजिद खान पठाण यांच्या नावाला रेटा होता. उमेदवाराचा हा वाद नंतर राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचला. राहुल गांधी यांनी देखील साजिद खान पठाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. साजिद खान पठाण हे अकोल्यातून निवडणूक जिंकले आहेत. परंतु विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाने नाना विरोधकांना आणखी एक कारण दिले आहे.
Devendra Fadnvais : प्रत्येक चर्चेसाठी तयार; राजकारण करू नये
नाना पटोले हे कोणाचेही ऐकत नसल्याने महाविकास आघाडीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना विरोध होतो. काँग्रेसकडून नाना पटोले यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना नाना पटोले मुख्यमंत्री नको होते. पटोले मुख्यमंत्री झाल्यास ते शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे चालू देणार नाही, हे पवारांना ठाऊक होते. आता नाना पटोले हे प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या गटनेता पदासाठी प्रयत्न करीत आहेत.
सध्या विधिमंडळामध्ये कोणत्याही पक्षाजवळ विरोधी पक्षनेते पद मिळावे यासाठी संख्याबळ नाही. काँग्रेसकडून या पदासाठी विनंती केली जात आहे. अशा परिस्थितीत नाना पटोले हे विधानसभा विरोधी पक्ष नेत्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे. नाना पटोले यांच्या या मनसुब्यांना सुरुंग लावण्यासाठी पटोले विरोधी गट सक्रिय झाला आहे. त्यामुळे नागपूरमधील बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.