Nagpur : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे काम खूप मोठे आहे. सरकारमध्ये सर्वात चांगले आणि मोठे काम गडकरींचेच आहे. पण त्यांचे सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करीत आहे, अशी टीका महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली.
सी. मो. झाडे फाउंडेशनच्या डॉ. सत्यनारायण नुवाल गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्रातर्फे ज्येष्ठ संपादक श्रीराम पवार यांना ‘डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी अनिल देशमुख आणि नितीन गडकरी व्यासपीठावर एकत्र होते.
अनिल देशमुख यांनी सुरुवातीला नितीन गडकरी यांच्या कार्याचे कौतुक केले. ‘केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात फक्त गडकरी यांचेच काम उत्तम आहे. पण आपला विरोध करणाऱ्यांना केंद्रीय तपास यंत्रणेला हाताशी घेऊन त्रास देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न अत्यंत संतापजनक आहे. गडकरी यांनी पुढाकार घेऊन हे थांबवायला हवे,’ असे आवाहन देशमुख यांनी केले.
या कार्यक्रमाला अ.भा. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव, सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार, पत्रकार विकास झाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सिव्हिल लाइन्स येथील चिटणवीस सेंटरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्यांना समाज विसरत नाही
ज्यांच्यामुळे समाजावर गुणात्मक परिणाम होतो, त्यांची कायम आठवण ठेवली जाते. जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत काम करण्याची मला संधी मिळाली. त्यांचे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्यांना समाज कधीही विसरत नसतो. श्रीराम पवार यांनी अत्यंत प्रामाणिक आणि व्यासंगी पत्रकारिता केली आहे. त्यामुळे त्यांचे पत्रकारितेतील योगदान नक्कीच पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
लोकमान्यतेची अपेक्षा ठेऊ नका
गडकरी म्हणाले, ‘श्रीराम पवार यांना 30 वर्षांपासून ओळखतो. मी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असताना त्यांना नाशिक मध्ये भेटायला गेलो होतो. त्यांनी अत्यंत तत्त्वनिष्ठ पत्रकारिता केली. सामाजिक जाणीव ठेऊन लेखन केले. समाजाचे हित बघून लिहिले.’लोकमान्यतेची आणि राजकीय पाठबळाची अपेक्षा न ठेवता काम करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.