Administrative Headache : एखाद्या निवड प्रक्रियेतील सावळा गोंधळ काय असतो हे बघायचे असेल तर गोंदिया जिल्ह्यात यावे लागणार आहे. गोंदियात रोजगार सेवकाच्या निवड प्रक्रियेत गोंधळ झाला आहे. त्यामुळे ही निवड प्रक्रियाच रद्द करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. अधिकाऱ्यांनी रोजगार सेवकाची निवड पुढे ढकलली आहे. सालेकसा तालुक्यातील साखरी टोला सातगाव ग्रामपंचायत अंतर्गत ही भरती होती.
गावातील रोजगार सेवकाच्या निवडीसाठी शनिवारी (28 सप्टेंबर) सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र सभेत रोजगार सेवकाच्या निवडीवरून प्रचंड गोंधळ झाला. त्यामुळे सरपंच व सदस्यांवर निवड प्रक्रिया रद्द करून ती पुढे ढकलण्याची वेळ आली. येथील रोजगार सेवकाचे पद अनेक दिवसांपासून रिक्त आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे काम करण्यासाठी रोजगार सेवकाची निवड प्रक्रिया जाहिरातीच्या माध्यमातून करण्यात आली होती.
असाही प्रकार
रोजगार सेवक पदासाठी एकूण 14 उमेदवारांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज सादर केले. त्या अनुषंगाने कोणाची निवड करायची, असा प्रश्न ग्रामपंचायतपुढे निर्माण झाला. ग्रामपंचायतकडून शनिवारी लोकशाही पद्धतीने निवडणुकीच्या माध्यमातून रोजगार सेवकाचे पद निवड करण्याचे ठरले. त्यानुसार प्रक्रिया करून घेण्यात आली होती. उमेदवारांनी आपणच निवडून यावे, यासाठी ‘सेटिंग’ करून ठेवल्याची चर्चा रंगली. शनिवारी सकाळी 11 वाजतापासून ग्रामपंचायतीच्या पटांगणावर निवड प्रक्रियेसाठी गर्दी झाली.
सर्वप्रथम एका रजिस्टरवर मतदारांच्या नावाची नोंद करण्यात आली. त्यावर सर्वांची स्वाक्षरी घेण्यात आली. दोन वाजेपासून निवडणुकीला सुरुवात झाली. 14 उमेदवारांमधून निवडीसाठी मतदान घेण्यात आले. मतदानाची प्रक्रिया सुरू असतानाच काही मतदारांनी दोन ते तीनदा मतदान केल्याचे लक्षात आले. त्यामुळे यावर आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर गोंधळ उडाला. परिणामी मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली. गोंधळामुळे बरेच लोक मतदानापासून वंचित राहिले. त्यानंतर मतमोजणी करण्यात आली. त्यात 23 मतदारांनी दोनदा मतदान केल्याचे लक्षात आले. त्यामुळे संपूर्ण निवड प्रक्रिया काही दिवसांसाठी रद्द करण्यात आली. सरपंच नरेश कावरे यांनी तशी घोषणा केली.
गावातील लोकांचा आक्षेप
गावातील काही लोकांनी यावर आक्षेप घेतला. ग्रामपंचायतीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे गोंधळात भर पडली. गोंधळात भर पडल्याने रोजगार सेवकाची निवड प्रक्रिया पुन्हा राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. आता यासाठी पुन्हा नवीन ‘टाइम टेबल’ जाहीर होणार आहे. त्यानुसार शासकीय यंत्रणेचा गुंता पुन्हा पाहायला मिळणार आहे. त्यामुळेच वेळीच रोजगार सेवकाची निवड प्रक्रिया पार पाडण्याचे आवाहन गोंदिया जिल्हा प्रशासनाकडूनकरण्यात येत आहे.