BJP News : भाजपचे विकासाच्या दृष्टीने अकोला लोकसभा मतदारसंघात तरूण उमेदवार दिला आहे. विकासची दृष्टी अनुप धोत्रे यांच्याकडे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला महासत्ता बनविण्याचे स्वप्न पाहिले आहे. पुढील पाच वर्षात देशाला सशक्त महासत्ता बनवायचे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट केले पाहिजे, त्यासाठी भाजपला मतदारांची साथ हवी आहे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
अकोला लोकसभा मतदारसंघातून भाजपचे अनुप धोत्रे यांनी बुधवारी (ता. 03) उमदेवारी अर्ज दाखल केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार आकाश फुंडकर, आमदार अमोल मिटकरी, माजी मंत्री रणजित पाटील, माजी आमदार गोपीकिशन बाजोरीया आदी यावेळी उपस्थित होते. शहरातून भव्य रॅली काढत भाजपने शक्तीप्रदर्शन केले. त्यानंतर धोत्रै यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
Lok Sabha Election : अकोल्यात पुन्हा तिरंगी लढत, वंचित, भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार झुंजणार !
रखरखत्या उन्हान रॅली
डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहापासून रॅली काढण्यात आली. त्यानंतर दुपारच्या सुमारास धोत्रे यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांच्याकडे अर्ज दाखल केला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळ सभा घेण्यात आली. भाजपचे विकासाच्या दृष्टीने अकोला लोकसभा मतदारसंघात तरूण उमेदवार दिला आहे, असे फडणवीस यावेळी म्हणाले. अनुप यांचे वडील खासदार संजय धोत्रे चार टर्म अकोला लोकसभेचे खासदार आहेत. प्रकृती अस्वास्थामुळे खासदार धोत्रे हे सार्वजनिक जीवनात नाहीत.
पाचव्यांदा धोत्रे यांच्याच कुटुंबातून अनुप यांना उमेदवारी जाहीर झाल्याने वडिलांच्या पक्षनिष्ठेचे फळ मुलाला मिळाले आहे. 2004 पासून भाजपचे संजय धोत्रे यांनी अकोला लोकसभा मतदारसंघ एकहाती ठेवला आहे. अनुप धोत्रे हे भाजप सोशल मीडियासेलच्या माध्यमातून दोन वर्षांपासून राजकारणात आहेत. अकोला लोकसभा निवडणूक प्रमुखपदी वर्णी लागल्यापासून ते सक्रिय झालेत. आता त्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.
प्रवास खडतर
भाजपने अनुप धोत्रे यांना उमेदवारी देत ‘पाटील लॉबी’चे राजकारण केले आहे. तर काँग्रेसनेही हाच पत्ता वर काढला आहे. अनुप धोत्रे यांना काँग्रेसचे डॉ. अभय पाटील, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या आव्हानाला तोंड द्यावे लागणार आहे. अकोल्यात प्रकाश आंबेडकर किंवा अभय पाटील यांच्यापैकी एकाने उमेदवारी मागे घेतल्यास भाजपचा रस्ता खडतर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस दोघांनीही आपापले उमेदवार घोषित केले असले तरी अखेरच्या क्षणापर्यंत दोघांपैकी कोणीतरी एकाने उमेदवारी अर्ज मागे घेत दुसऱ्याला पाठिंबा द्यावा, असा प्रयत्न अद्यापही सुरू आहे.