Akola Constituency : लोकसभा निवडणुकीनंतर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात पराभूत झाल्यानंतर काँग्रेस उमेदवार डॉ. अभय पाटील यांनी वंचितचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. अकोल्यात प्रकाश आंबेडकरांची भूमिका ही भाजपाला पूरक होती. त्यातूनच त्यांनी निवडणुकीदरम्यान अनेकदा आपल्यावर वैयक्तिक टीका आणि आरोप केल्याचं अभय पाटील म्हणाले.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात तिहेरी काट्याची लढत पाहायला मिळाली. या लढतीत भाजपचे उमेदवार अनूप धोत्रे विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या डॉ. अभय पाटील यांचा पराभव केला. शिवाय वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष प्रकाश आंबेडकर देखील पराभूत झाले आहेत. चाळीशीतील अनुप धोत्रे या निवडणुकीत जायंट किलर ठरले. त्यांनी पहिल्याच निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांसह काँग्रेस उमेदवाराचा दारूण पराभव केला. अनुप धोत्रे यांचे वडील संजय धोत्रे याआधी सलग चार वेळेस खासदार झाले होते. मात्र संजय धोत्रे आजारी असल्याने यंदा अनुप धोत्रेंना भाजपनं मैदानात उतरवलं होतं.
दरम्यान या निकालानंतर आता काँग्रेस आणि वंचित मध्ये जुंपली आहे. डॉ. अभय पाटील यांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर आरोप केले आहेत. अभय पाटील हे अकोला येथे बोलत होते. अकोल्यात प्रकाश आंबेडकरांची भूमिका ही भाजपाला पूरक होती. प्रकाश आंबेडकरांनी भाजप ऐवजी आपल्यावरच टीका करण्यावर भर दिला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तर मतदारांनी 2019 च्या तुलनेत आंबेडकरांचा मताधिक्य घटवल्याचा टोला अभय पाटील यांनी लगावला. दरम्यान आपल्या पराभवाचं आत्मचिंतन करून पुढची दिशा ठरवणार असल्याचा अभय पाटील म्हणाले.
वंचितकडून अभय पाटील यांना प्रत्युत्तर!
ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचे अपरिपक्व राजकीय भूमिका असल्याचा आरोप करणारे डॉ अभय पाटील पराभवामुळे हताश झाले आहेत. निराशेतून त्यांनी वंचित वर व्यक्तिगत टीका केल्याचा पलटवार वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी केला आहे. वंचित कडून केलेले आरोप हे व्यक्तिगत नव्हते.वंचित कडून कुणीही डॉ अभय पाटील यांचे चारित्र्य बाबत त्यांचे पेशा बद्दल किंवा त्यांचे वर व्यसन, हत्यार दाखविणे यावर बोलले नाही.तर ते ज्या संघटने मध्ये कार्यरत होते, त्याबद्दल वंचित ने प्रश्न केले होते.
कारण डॉ पाटील आणि त्यांचे वडील ज्या संघटने मध्ये काम करीत होते, त्यांचे कडून बाबरी मशिद उध्वस्त करून त्याचे उद्दातीकरण केले जात होते, की नाही. असेही पातोडे यांनी म्हटलं आहे. काँग्रेस देखील त्याच विचारधारेचा विरोध आहे.म्हणून सरदार पटेल यांनी संघावर बंदी घातली होती. त्यामूळे डॉ पाटील यांचे वर कुणीही व्यक्तिगत टीका केली नाही.उलट वंचित समूहाने देशात केवळ काँगेस निवडणुक लढेल आणि त्यांनाच मते करायची अशी अपेक्षा त्यांना असावी.देशात लोकशाही आहे याचा विसर त्यांना पडलेला दिसतो. असेही पातोडे म्हणाले तर बाळासाहेब आंबेडकर यांच्या वर भाजप पूरक भूमिका घेण्याचा आरोप करण्यापूर्वी त्यांनी स्वतःची संघाची पार्श्वभूमी आणि त्यांचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भाजप रिटर्न आहेत, हे त्यांनी विसरू नये असा सल्ला देखील वंचितने दिला होता.