महाराष्ट्र

Pune Hit and Run : अंजली दमानियांकडे पुरावे आहेत का?

NCP Umesh Patil : दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे

Maharashtra Politics : अंजली दमानिया या सुपारी घेऊन आमचे नेते अजित पवार यांच्या मागे लागल्या आहेत. त्यांचा बोलविता धनी कोण आहे, हे समजण्यासाठी त्यांची नार्को टेस्ट करून कॉल डिटेल्स चेक केले पाहिजे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी म्हटले आहे.

पुणे कल्याणीनगर येथे घडलेल्या अपघातप्रकरणी अंजली दमानिया यांनी अजित पवार यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली होती. यावर आज (ता. 29) मुंबईत पत्रकारांशी बोलताना उमेश पाटील यांनी अंजली दमानिया यांच्यावर सडकून टीका केली. पुण्यातील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. यात वादच नाही. या घटनेने सर्वांचे मन हेलावून सोडले आहे. या घटनेची योग्य पध्दतीने कारवाई होताना आपण पहात आहोत.

काय म्हणाले उमेश पाटील 

या घटनेतील अपराध्यांना मदत करणार्‍या दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. दोन डॉक्टरांना पोलिसांनी अटक केली आहे. संपूर्ण प्रकरणात मुलाला, वडिलांना आणि आजोबांनाही अटक करण्यात आली आहे. मात्र जाणीवपूर्वक आमच्या नेत्यांना सुपारी घेऊन टार्गेट करण्याचा उद्योग काही लोकांनी चालवला आहे, अशी जोरदार टीका उमेश पाटील यांनी केली.

राज्यात दुष्काळाचे सावट असल्याने अजित पवार मंत्रालयात बैठक घेत होते. तर काही लोक जम्मू – काश्मीरमध्ये श्रमपरिहार करण्यासाठी गेले आहेत. मतदान संपताच दुसर्‍या दिवशी अजित पवार मंत्रालयात येऊन काम करत होते. मात्र अजित पवार कामाचा आव आणतात, असे अंजली दमानिया बोलत आहेत. अहो, तुमच्यासारखा समाजसेवेचा आव आणत नाहीत. ३५ वर्षे झाली हा महाराष्ट्र पाहतोय अजित पवार सकाळी सहा वाजता उठून लोकांच्या कामांसाठी उपलब्ध असतात म्हणूनच लाखो मतांनी लोक त्यांना निवडून देतात.

तुम्हाला कुणी कधी निवडून दिले आहे का? तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये कधी निवडून आला आहात का? एखादी निवडणूक लढवून लोक किती तुमच्या पाठीशी आहेत, हे तपासून का घेत नाही, असे अनेक सवाल उमेश पाटील यांनी अंजली दमानिया यांना केले. अजित पवार यांच्यावर आरोप करणार्‍या अंजली दमानिया यांच्याकडे पुरावे आहेत का? पुण्याच्या कमिश्नरला पालकमंत्री म्हणून त्यांनी विचारणा करायची नाही का? की अजितदादांनी अंजली दमानिया यांना विचारुन कॉल करायचा होता? तुमच्यासारख्या मिडियासॅव्ही असलेल्या व्यक्तीला ती गरज आहे.

आव्हाडांची नौटंकी 

काम करणाऱ्या व्यक्तीला मिडिया आहे की नाही, याच्याशी घेणेदेणे नसते, असेही उमेश पाटील यांनी ठणकावून सांगितले. राज्यात ज्या अनेक घटना घडल्या, त्या घटनांबद्दल खरंच अंजली दमानिया संवेदनशील आहेत का? की फक्त पुणे घटनेवर त्यांनी कुणाकडून सुपारी घेतली आहे, हे जाहीर करावे, असे आव्हान उमेश पाटील यांनी दिले. मनुस्मृती ही प्रतिगामी असलेली विचारधारा आम्हाला मान्य नाही. परंतु ज्या पद्धतीची नौटंकी जितेंद्र आव्हाड करत आहेत. त्यांचा मनाचे श्लोक, भगवद्गीता यांपैकी नेमका कशाला विरोध आहे. मनुस्मृतीला की, भगवद्गीतेला विरोध आहे की, समर्थ रामदासांना विरोध आहे. जितेंद्र आव्हाड यांचा समर्थ रामदासांना विरोध आहे, असा थेट हल्लाबोल उमेश पाटील यांनी केला.

NCP : आव्हाडांच्या स्टंटबाजीवर भडकले प्रशांत पवार

शालेय शिक्षणात मुल्यशिक्षणाला महत्व आहे. मुल्यशिक्षणाचे गांभीर्य पुण्यातील दुर्घटनेवरुन लक्षात येते. भगवद्गीतेचा समावेश शालेय शिक्षणात झाला तर जितेंद्र आव्हाड यांना काय आक्षेप आहे? मनाच्या श्लोकातून मुलांवर संस्कार होणार असतील तर त्यावर जितेंद्र आव्हाड यांचा आक्षेप का आहे? चातुर्वर्ण्य व्यवस्था जी आहे ती मनुस्मृतीमध्ये स्वीकारली गेली, त्याला विरोध असणे समजू शकतो. त्याला आमचाही विरोध आहे. आमचे सरकार असेपर्यंत ते कुठल्याही अभ्यासक्रमात समाविष्ट करु दिले जाणार नाही, असेही उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.

सरकारकडून सूचना आणि हरकती मागविल्या गेल्या आहेत. एखादा निर्णय थेट होत नाही. याबाबत जितेंद्र आव्हाड आपण सरकारला पत्र लिहिले आहे का? की फक्त स्टंटबाजी करण्यासाठी मनुस्मृती जाळण्याचा उद्योग तुम्ही करत आहात. मनुस्मृती जाळली म्हणून तुम्ही पुरोगामी होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, फुले, शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हा मनापासून आत्मसात आहे. त्याला प्रदर्शन करण्याची आवश्यकता नाही, असा टोलाही उमेश पाटील यांनी लगावला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!