Vanchit Bahujan Aghadi : अर्ज दाखल करायला एक मिनिट उशीरा पोहोचल्यामुळे रिंगणात उतरण्याची संधी हुकली. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे सदस्य व राज्याचे माजी मंत्री अनिस अहमद हे प्रचंड नाराज झाले आहेत. त्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे दाद मागण्याचे ठरविले आहे. मध्य नागपूर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातील 29 ऑक्टोबरचे व्हिडिओ फुटेज हवे आहे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
अनिस अहमद यांना आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यास उशीर झाल्याने मध्य नागपूरमधून अर्ज भरण्याची संधी हुकली आहे. यामुळे मध्य नागपुरात भाजपसमोरील चिंता वाढली असून हा जाणुनबुजून केलेला गेम असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र याच्याशी काँग्रेसचा कुठलाही संबंध नाही. मला कुठल्याही काँग्रेसच्या नेत्यांचा फोन आलेला नव्हता. तसेच माझं कुठलाही काँग्रेसच्या नेत्यांशी बोलण झालेलं नाही. असे अहमद यांनी स्पष्ट केले.
विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने उमेदवार निवडताना काँग्रेस नेते महाराष्ट्रात सोशल इंजिनिअरिंगमध्ये अपयशी झाले आहेत. अनेक जातीच्या उमेदवारांना संधीच मिळालेली नाही. संपूर्ण महाराष्ट्रात बंजारा समाजाला उमेदवारी नाही. तेली समाजाला उमेदवारी दिलेली नाही. नागपुरात हलबा समाजाला टाळण्यात आले आहे. मुस्लिम समाजाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे, याकडे अहमद यांनी लक्ष वेधले.
यंदा तिकीट वाटपात जी चूक केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात विपरीत निकाल पाहायला मिळतील. विशेष जातींना यंदा न्याय देण्यात आलेले नाही. अभ्यास करून उमेदवार द्यायला पाहिजे होते, मात्र आता निकाल धक्कादायक येऊ शकतात. निकाल आल्यानंतर समीकरण पाहून मी पुढील वाटचाल ठरविणार असे अहमद यांनी सांगितले.
भाजपचे पुढचे पाऊल काय?
अनिस अहमद यांनी अर्ज भरला असता तर भाजपचे उमेदवार प्रवीण दटके यांच्यापुढील मोठं संकट टळलं असतं. पण, तसे होऊ शकले नाही. तरीही माजी नगरसेवक असलम खान यांनी अर्ज भरल्यामुळे थोडीफार आशा होती. त्यांचा अर्ज अवैध ठरल्याने ती आशा देखील मावळली. आता हलबा समाजाचे रमेश पुणेकर व इतर नेते मैदानात आहेत. त्यांच्यापैकी एकच लढणार असल्याचे सांगितले जाते. या संपूर्ण पार्श्वभूमीवर भाजपचे पुढचे पाऊल काय असेल, याची उत्सुकता लागलेली आहे.