BJP Criticizism : होय मी काँग्रेस विचारसारणीचा आहे. काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता आहे. पण काँग्रेसच्या सांगण्यावरून न्यायालयात याचिका दाखल केलेली नाही. सरकारच्या निधीचा अपव्यय होत असल्याने याचिका दाखल केली आहे. अनिल वडपल्लीवार यांनी सोमवारी (ता. 2) हे स्पष्टीकरण दिले. नागपूर येथे वडपल्लीवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. उपराजधानीत मुख्यमंत्री लाडकी बहीणा योजनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अनिल वडपल्लीवार यांच्यावर टीका केली.
वडपल्लीवार हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे निवडणूक प्रचार प्रमुख होते. आमदार विकास ठाकरे आणि माजी आमदार सुनिल केदार यांचे ते नीकटवर्तीय आहे, असा जाहीर आरोप फडणवीस यांनी केला. हा आरोप करताना फडणवीस यांनी कोर्टात दाखल याचिकेचा कागदही दाखविला. फडणवीस यांच्या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. लागलीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांना वडपल्लीवार आणि काँग्रेस यांचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले.
वडपल्लीवार यांची कबुली
आरोप-प्रत्यारोपांनंतर वडपल्लीवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आपण कोणत्याही एका विशिष्ट योजनेच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केलेली नाही. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार असतानाही आपण याचिका दाखल केल्या आहेत. त्यामुळे आपण केवळ एका विशिष्ट सरकारविरोधात आहोत असे म्हणणे चुकीचे आहे, असे वडपल्लीवार म्हणाले. आपण काँग्रेस विचारसारणीचे आहोत. आपण काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत. काँग्रेस पक्षाकडून आपल्याला जेव्हा जेव्हा बोलाविले जाते, तेव्हा आपण जातो. परंतु काँग्रेसच्या सांगण्यावरून याचिका दाखल केली, हे खोटे आहे. काँग्रेस नेत्यांसोबत आपण फोटोही आहेत. ते दखविले जाऊ शकतात, असेही वडपल्लीवार म्हणाले.
आपण कोणाचेही स्वीय सहाय्यक (Personal Assistant) नव्हतो. त्यामुळे आपल्याविरोधात झालेले आरोप चुकीचे आहेत. याचिकेत जनतेचा पैसा योग्य पद्धतीने वापरण्यात यावा, अशीच मागणी केली आहे. कोणत्याही योजनेचा गरीबांना फायदा होत असेल तर चांगलेच आहे. आपल्या लढ्याला राजकीय वळण मिळाले आहे. याचिकेबाबत आपण जास्त बोलणार नाही. याचिकेवर सुनावणी सुरू आहे. त्यामुळे जास्त बोलणे योग्य नाही. आपल्या याचिकेत सत्ताधाऱ्यांचाही उल्लेख नाही. त्यामुळे याचिकेचा पूर्ण अभ्यास न करता बोलण्यात येत आहे. नाना पटोले आणि विकास ठाकरे यांच्या निवडणुकीसाठी आपण काम केले. आपण निवडणूक प्रतिनिधी होतो, असेही वडपल्लीवार यांनी कबूल केले. याचिकेवर 18 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.