Congress : राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) ४५ उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी जाहीर केली. बहुतांश जागांवर अपेक्षित उमेदवार आहेत. त्यामुळे दुसऱ्या यादीकडे लक्ष लागलेले आहे. पहिल्या यादीत काटोलमधून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नावाची घोषणा झाली आहे. त्यामुळे मुलगा सलील देशमुख यांच्या नावाची चर्चा केवळ संभ्रम निर्माण करण्यासाठी होती, हे स्पष्ट झाले. दुसरीकडे, महायुतीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. याठिकाणी भाजपमधून आशीष देशमुख आणि चरणसिंग ठाकूर दोघेही इच्छुक आहेत.
देशमुख यांचा काटोल बालेकिल्ला
काटोल हा अनिल देशमुख यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे. २०१४ चा अपवाद वगळता काटोलमधून ते पाचवेळी विजयी झाले आहेत. यंदाही ते काटोलमधून लढणार हे निश्चितच होते. मात्र, तरीही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देशमुख दक्षिण पश्चिम नागपूरमधून फडणविसांच्या विरोधात लढणार असल्याचे संकेत दिले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तर तसा प्रस्ताव आल्यास विचार करू, असेही म्हटले होते. त्यामुळे फडणवीस विरुद्ध देशमुख अशी चर्चा अनेक दिवस चालली.
अशात काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख आणि त्यांचे सुपूत्र सलील देशमुख यांनी यात्रेद्वारे लोकांशी संवाद साधला. एकत्र पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी काटोलमधून आमच्यापैकी कोण लढणार याबाबत निर्णय अद्याप व्हायचा आहे, असे सांगितले. त्यांच्या विधानामुळे अधिक संभ्रम निर्माण झाला. मुलाला लॉन्च करण्याची तयारी सुरू असल्यातचेही बोलले जाऊ लागले. पण, गुरुवारी सायंकाळी जयंत पाटील यांनी त्यांच्या नावाची घोषणा करून चर्चांवर पूर्णविराम लावला.
जयंत पाटील यांनी जाहीर केलेल्या यादीत नागपूर जिल्ह्यातील दोन जागा आहे. काटोल येथून अनिल देशमुख आणि नागपूर पूर्वमधून दुनेश्वर पेठे यांचा यात समावेश आहे. दुनेश्वर पेठे गुरुवारी सकाळीच एबी फॉर्म घेऊन नागपुरात दाखल झाले. आपणच पूर्वमधून महाविकास आघाडीचे उमेदवार आहोत, असा दावा त्यांनी केला होता. त्यावरही जयंत पाटील यांनी शिक्कामोर्तब केले.
Assembly Election : उद्धव यांच्या भेटीसाठी केदार, मुळक मुंबईत!
देशमुखांची ‘लिगसी’
काटोलमधून १९९५ मध्ये अनिल देशमुख अपक्ष लढले आणि विजयी झाले होते. त्यानंतर १९९९, २००४, २००९ अशा सलग निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यामुळे काटोलमध्ये त्यांचे निर्विवाद वर्चस्व निर्माण झाले. अशात २०१४ मध्ये त्यांच्याच पुतण्याने आशीष देशमुख यांनी आव्हान उभे केले. अनिल देशमुख यांच्यासाठी हा पहिला पराभव बोता. पण, २०१९ मध्ये त्यांनी बाऊन्स बॅक केले आणि पुन्हा दमदार विजय मिळवला. १९९५ पासून पाचवेळा अनिल देशमुख आणि एकदा आशीष देशमुख अशी देशमुखांचीच लिगसी राहिली आहे.