Congress : मनसुख हिरेनची हत्या होईल हे अनिल देशमुखांना माहिती होते की नाही? असा थेट सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केला होता. त्यावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रत्युत्तर देताना गंभीर आरोप केले आहेत. ‘ती’ बॉडी मनसुख हिरेनची आहे, हे देवेंद्र फडणवीस यांना माहिती होते’, असा पलटवार अनिल देशमुख यांनी केला आहे. देशमुख यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
गंभीर आरोप
‘मनसुख हिरेनची बॉडी सकाळी सापडली. पोलीस खात्याला बॉडी मिळाल्यावर जोपर्यंत कुटुंबाने अधिकृतपणे ओळख पटवाली नव्हती, तोपर्यंत ही बॉडी मंसुख हिरेनची आहे हे मी सुद्धा सांगितलं नाही,’ असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अनिल देशमुख सातत्याने फडणविसांवर गंभीर आरोप करत आहेत. मात्र, फडणवीस त्यावर अवाक्षरही बोलले नाहीत. यावेळी फडणवीस यांनी थेट सवाल केल्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला आहे.
मनसुख हिरेनच्या हत्येच्या प्रकरणाबाबत सदनामध्ये मी का शंका घेतली? त्यावेळी मनसुख हिरेन यांना गायब करण्यात आलं आणि त्यांची हत्या होऊ शकते, अशी भीती मी व्यक्त केली होती. त्यामुळे माझे स्पष्ट मत आहे की तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत उत्तर द्यावे. मात्र, ते यावर बोलणार नाहीत. कधी ना कधी सत्य बाहेर येईल, असे फडणवीस एका वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते. यावर अनिल देशमुख यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
ओळख पटेपर्यंत बॉडी मंसुख हिरेनची आहे हे कुणालाही सांगितलं नाही. पण देवेंद्र फडणवीस आणि वाझे यांना माहीत होतं. NIA पमबीर सिंगला अटक करायला येणार होती. पण त्यांना फडणवीस यांनी संरक्षण दिले, असा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे. देशमुख यांनी आपल्या पुस्तकाचाही उल्लेख केला. ते म्हणाले, ‘माझ्या ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ या पुस्तकात प्रत्येक घटनेचा सविस्तर उल्लेख आहे. या घटनाक्रमातून तुम्हाला सत्य कळेल. माझं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. त्यात प्रत्येक गोष्ट मांडण्यात आली आहे,’ असंही देशमुख म्हणाले.
‘डुप्लिकेट अनिल देशमुख माझ्या प्रेमापोटी’
डमी अनिल देशमुखची माहिती मला मिळाली आहे. भाजपने माझ्या नावाशी साधर्म्य असलेला माणूस पकडून त्याला उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्रातील जनतेसा सारंकाही कळत आहे. ‘अनिल देशमुख’ या नावावर असलेल्या प्रेमापोटी भाजप आणि राष्ट्रवादीने त्या नावाचा उमेदवार दिला आहे. मात्र, जनता चूक करणार नाही. डुप्लिकेट अनिल देशमुखला मते मिळणार नाहीत, असं देशमुख म्हणाले.
अजित पवार फडणविसांच्या मांडीवर
आर.आर. पाटील आज आपल्यात नाहीत. जुन्या सहकाऱ्यांबद्दल असे वक्तव्य करणे योग्य नाही. पण, अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीवर जाऊन बसले आहेत. त्यामुळे फडणवीस जे सांगतात तेच ते बोलतात, अशी टीका देशमुख यांनी केली.