Anil Deshmukh : काटोलचे राजकारण आपल्याच कुटुंबाभवती फिरते, हे अनिल देशमुख यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दिले आहे. काटोलमध्ये आपल्या कुटुंबाचे निर्विवाद वर्चस्व आहे, हे दाखवून देण्याचा त्यांचा प्रयत्न निवडणुकीत किती यशस्वी ठरतो, हे निकालानंतर स्पष्ट होईलच. पण, देशमुखांऐवजी त्यांचे सुपूत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय अचानक कसा झाला, याबाबत राजकीय चर्चा रंगत आहेत.
काटोल मधून अनिल देशमुखच रिंगणात उतरणार, हे सुरुवातीपासून निश्चित होते. पण, ते फडणविसांच्या विरोधात लढतील आणि मुलाला काटोल सोपवतील, अशी चर्चा सुरू झाली. त्यानंतर अनिल देशमुख यांनी प्रत्येकवेळी कोणत्या मतदारसंघातून लढायचे याचा निर्णय पक्ष घेईल, असेच सांगितले. पण त्याचवेळी काटोल आपल्याच हातात असल्याचेही अप्रत्यक्षरित्या स्पष्ट केले. मात्र, अनेक वर्षे काटोलमधून लढणारे देशमुख यावेळी मतदारसंघातून कोण लढणार याबाबत यंदा स्पष्ट का बोलत नव्हते, हा प्रश्न कायम होता.
अनिल देशमुख यांचे सुपूत्र सलील देशमुख विधानसभा लढण्यासाठी इच्छुक होते. 2019 मध्येही त्यांच्याच नावाची चर्चा होती. पण 2014 च्या पराभवाचे शल्य दूर करण्यासाठी अनिल देशमुखच पुन्हा रिंगणात उतरले. ते विजयी झाले आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीही झाले. पण ग्रह फिरले आणि 14 महिन्यांचा तुरुंगवास वाट्याला आला. या संपूर्ण कालावधीत सलील देशमुख किल्ला लढवत होते. वडिलांवरील संकट दूर होण्यासाठी झटत होते. यादरम्यान आपल्या पाठिशी जनता उभी राहील यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. काटोल मतदारसंघातही राष्ट्रवादीची धुरा त्यांच्याच खांद्यावर होती.
देशमुख यांच्यावर गंभीर आरोप
अनिल देशमुख तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर कुटुंबात आनंद निर्माण झाला. देशमुख यांना आता गंभीर आरोपांचे मळभ दूर करायचे होते. त्यांचे लक्ष्य फक्त फडणवीस आहेत, हे स्पष्ट होते. त्यानुसार त्यांनी अध्येमध्ये फडणविसांवर हल्लाबोलही सुरू केला. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी थेट गंभीर आरोप सुरू केले. आता तर त्यांचे पुस्तकही प्रकाशित होणार आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर काटोलचा प्रश्न होताच. सलील यांनी विधानसभा लढण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर दोघांनी मतदारसंघात यात्रा काढून जनमत जाणून घेतले. त्याचवेळी ‘कोण लढणार, याचा निर्णय नंतर घेऊ’ असेही सांगितले.
Assembly Election : देशमुख बॅकफुटवर जाताच सतीश शिंदेंची एन्ट्री!
सलील देशमुख यांची इच्छा
अनिल देशमुख यांना काटोलची उमेदवारी जाहीर झाली. पण, सलील यांची इच्छा कायम होती. पक्षाने दिलेला एबी फॉर्म मुलाला देण्याची इच्छाही होती आणि राजकारणातून अश्या पद्धतीने बाहेरही पडायचे नव्हते. अशी अनिल देशमुख यांची अवस्था होता. पक्षाने हा निर्णय कुटुंबावर सोडल्याने वादाचा प्रश्नच नव्हता. पिता-पुत्रांनी घरातच चर्चा केली आणि उमेदवार ठरला. काटोलमध्ये आता अनिल देशमुख नव्हे तर सलील देशमुख लढणार, हे जाहीर करण्यात आले. या संपूर्ण घटनाक्रमात देशमुख पिता-पुत्रांमध्ये काटोलच्या उमेदवारीवरून वाद झाला होता, अश्याही चर्चा आता होत आहेत.