Assembly Election : भाजपा प्रणित सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यातील जनता हैराण झाली आहे. शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. महागाईने सामान्य नागरिक त्रस्त आहेत. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने आता यात्रा काढण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करेल अशी ग्वाही माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांनी दिली.
व्याहाड ते मोवाड लढा माझ्या शेतकऱ्याचा ही यात्रा माजी गृहमंत्री अनिल देशमुख व जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांच्या नेतृत्वात शुक्रवारपासून व्याहाड येथुन सुरू झाली. यावेळी देशमुख बोलत होते. देशातून मोठ्या प्रमाणात कापसाचे आयात होत आहे. त्यामुळे कापसाला भाव मिळत नाही. सध्या संत्रा व मोसंबीला मातीमोल भाव आहे. बांग्लादेशला संत्रा पाठविण्यासाठी अगोदर 18 रुपये कर लागत होता. आता तोच कर 108 रुपये झाला आहे. त्यामुळे संत्रा व मोसंबीची निर्यात होत नाही. परिणामी शेतकऱ्यांना भाव मिळत नाही, असं देशमुख म्हणाले.
सोयाबीनचे हाल
सोयाबीन तेल व सोयापेंड मोठ्या प्रमाणात आयात करण्यात येत आहे. त्यामुळे सोयाबीनला भाव मिळत नाही. नुकसान होवूनही शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळत नाही. पिकविमा कंपनीकडून जाचक अटी लावण्यात येत आहे. मदत देण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत आहे. दुसरीकडे खते, फवारणीची औषध, शेतीची अवजारे यांच्यावर मोठ्या प्रमाणात जीएसटी आहे. त्यामुळे त्यांचे भाव वाढले आहेत. परिणामी उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. बाजारात शेतमालाला जो भाव मिळत आहे, त्यातून साधा उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे, असे देशमुख यांनी नमूद केले.
खाण्याच्या तेलापासून ते मिठापर्यंत सर्वच वस्तुंच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हे सर्व विषय घेवून ही यात्रा काढल्याचे देशमुख यांनी सांगितले. यात्रेचा पहिला टप्पा व्याहाड ते मोवाड आहे. 6 दिवसात 70 गावात ही यात्रा जाणार आहे. दररोज सकाळी 8 वाजतापासून यात्रेला सुरुवात होईल. रात्री 8 वाजता त्या दिवशीची यात्रस संपेल.
व्याहाड पासून सुरुवात
पहिल्या दिवशी ही यात्रा व्याहाड येथुन सुरू झाली. पेठ, धामणा, सातनवरी, बाजारगाव, शिवा, दुधाळा, कचारी सावंगा, रिधोरा करीत लिंगा येथे यात्रा मुक्कामस्थळी पोहोचली. यात्रेत शिवसेना उद्धव ठाकरे गट, काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी आहेत. सामान्य नागरीक मोठ्या संख्येने यात्रेत आहेत. शनिवारी ही यात्रा काटोलपासून सुरू होईल. डोंगरगाव, येनवा, गोन्ही, चिखली, मेंडकी, सोनोली मार्गाने सावरगाव येथे मुक्कामी असेल.