Assembly Election : चंद्रपूर जिल्हा आणि बल्लारपूरचा कायापालट करण्यात सुधीर मुनगंटीवार यांचा सिंहाचा वाटा आहे. शेतकऱ्यांच्या पीकविम्याचा मुद्दा असो की लाडक्या बहिणींना न्याय असो, मुनगंटीवार यांनी नेहमीच विकासाला प्राधान्य दिले आहे. जातपात, धर्म, पंथ, समाज असा कोणताही भेद न पाळता सुधीर मुनगंटीवार यांनी केवळ विकासच केला आहे. हा विकास निरंतर हवा असेल तर सुधीर मुनगंटीवार या नावाशिवाय दुसरा पर्याय नाही, या शब्दांत आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री तथा तेलुगू अभिनेता पवन कल्याण यांनी मुनगंटीवार यांना निवडून देण्याचे आवाहन केले.
बल्लारपूरच्या डब्ल्यूसीएल मैदान परिसरात आयोजित सभेत पवन कल्याण यांनी सर्वांना विकासाची दृष्टी असलेल्या सुधीर मुनगंटीवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं. मराठी, हिंदी, तेलुगू अशा तीन भाषेत बोलत पवन कल्याण यांनी बल्लारपूरवासियांची मनं जिंकली. छत्रपती शिवाजी महाराज यांना कल्याण यांनी मराठीतून अभिवादन केलं. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं प्रत्येक स्वप्न महायुती सरकार आणि सुधीर मुनगंटीवार पूर्ण करीत असल्याचं ते म्हणाले. सनातन धर्माचं रक्षण करणं आज गरजेचं झालं आहे. सुधीर मुनगंटीवार हे सनातन धर्मासोबतच विकासाच्या मुद्द्यावर काम करणारे आहेत, असं ते म्हणाले.
भविष्यात चित्र बदलेल
चंद्रपूर आणि बल्लारपूर या भागाची अवस्था आधी काय होती, हे सगळ्यांनी आठवावं. सुधीर मुनगंटीवार यांनी सूत्रं हाती घेतल्यानंतर आता चंद्रपूरचा कायापालट झाला आहे. देशातील सर्वोत्तम सैनिक शाळा झाली आहे. वन अकादमी झाली आहे. ‘हायवेमॅन’ नितीन गडकरी यांच्या मदतीनं मुनगंटीवार यांनी चंद्रपुरातून गेलेल्या सर्व महामार्गांचा कायापालट केला आहे. शहरी आणि ग्रामीण रस्ते चकाचक झाले आहेत. तहसील आणि एसडीओ कार्यालयांनी कात टाकली आहे. बल्लारपूर मतदारसंघात तेलुगू भाषिकांची संख्या प्रचंड मोठी आहे. या समाजानं नेहमीच विकासाचा, सनातन धर्माचा साथ दिला आहे. त्यामुळं यंदाही आपल्याला हिच निवड करायची आहे, असं पवन कल्याण म्हणाले.
Sudhir Mungantiwar : बल्लारपूरचा कायापालट करण्यासाठी वचनबद्ध
मी अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. चित्रपट सगळ्यांनाच आवडतात. त्यामुळं एका मुद्द्यावर सगळ्यांचं लक्ष वेधतो. बाहुबली चित्रपटात राजमाता शिवगामी यांचं पाऊल थांबायला नको होतं. त्यामुळं बाहुबलीनं आपल पूर्ण जोर पणाला लावला. अगदी त्याच पद्धतीनं बल्लापुरातील जनतेने विकासाच्या मुद्द्यावर पूर्ण जोर लावणे गरजेचे असल्याचेही पवन कल्याण म्हणाले. विदर्भाचा चेहरामोहरा आता बदलणार आहे. शेतकरी सुखात असेल. सामान्य माणूस समाधानाने जगेल. बेरोजगारांच्या हाताला वेगानं काम मिळेल, असंही आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण म्हणाले.