Mahayuti Vs Mahavikas Aghadi : श्याम मानव यांच्यासह राज्यभरातील पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आता महाराष्ट्र बचाव मोहिम हाती घेतली आहे. राज्यात होणाऱ्या विधानभा निवडणुकीपूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते राज्यभरात सभांच्या माध्यमातून जनजागृती करणार आहेत. संविधान आणि लोकशाही अद्यापही धोक्यात आहे. त्यामुळे हा लढा देण्यात येत असल्याचे श्याम मानव यांनी नागपुरात बोलताना सांगितले. संविधान बचाव, महाराष्ट्र बचाव या शिर्षकाखाली सर्वच अभियान राबिवण्यात येणार आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संयोजक श्याम मानव आणि चळवळीतील कार्यकर्ते या अभियानात उतरल्याने त्याचा फटका सहाजिकच भाजपला (BJP) आगामी निवडणुकीत बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे मानव यांच्या या मोहिमेला महाविकास आघाडीतील घटक पक्ष पाठिंबा देतील, असे सांगण्यात येत आहे. सध्या अनेक मुद्द्यांवरून महायुती सरकारला घेरण्याचे प्रयत्न महाराष्ट्रात सुरू आहेत. याला पूरक म्हणून आता पुरोगाी कार्यकर्तेही अभियानात उतरले आहेत.
वक्त्यांना प्रशिक्षण
पुरोगामी कार्यकर्त्यांना राज्यभरातील कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेण्यात येणार आहे. त्यासाठी व्याख्यानांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने यासाठी पुढाकार घेतला आहे. वर्धा (Wardha) जिल्ह्यातील सेवाग्राम येथे वक्ता प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येणार आहे. पूर्व तयारी शिबिरही आयोजित केले जाईल. या शिबिरात सांप्रदायिक आणि मनुवादी विचारसारणीला कसा विरोध करायचा, याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. संविधान, समानता टिकवायची असेल आणि मनुवाद दूर करायचा असेल तर ‘इंडिया’ आघाडीचे सरकार यावे, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यातील महायुतीपुढे आणखी एक आव्हान निर्माण झाले आहे.
देशात लोकसभा निवडणूक (Lok Sabha) प्रचार सुरू असतानाही व्याख्यानांची मालिका घेण्यात आली होती. याशिवास सोशल मीडियावरून व्यापक प्रचारही करण्यात आला. प्रा. मानव यांनी महाविकास आघाडीसाठी 36 सभा घेतल्या. याचाच परिणाम म्हणून विदर्भातील दहा पैकी सात जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजय मिळाल्याचा दावाही करण्यात येत आहे. राज्यातील शहरी नक्षलवादाला (Urban Naxalism) आळा घालण्यासाठी सरकारने महाराष्ट्र जनसुरक्षा अधिनियम विधेयक आणले आहेत. नक्षलवादाला आळा घालण्यासाठी हा कायदा करण्यात आला आहे. परंतु या कायद्याआड पुरोगामी संस्था, सामाजिक संघटनांची मुस्कटदाबी सरकारने सुरू केली आहे. अनेक संस्था, संघटनांवर बंदी लागू केली जात असल्याचेही प्रा. श्याम मानव म्हणाले.