या लेखातील मतं ही लेखकाची आहेत. या मतांशी द लोकहित सहमत असेलच असं नाही.
Speech Of RSS Chief : ‘लेकुरे उदंड झाली, ते तो लक्ष्मी निघोनी गेली, बापुडे भिकेस लागली अन्न खायला मिळेना’ अस संत रामदास स्वामी महाराजांनी लिहिलं आहे. सार्थ दासबोध या अत्युत्तम ग्रंथातील या ओळी त्या काळात संयुक्तीक होत्या. जनसंख्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या त्यातून अधोरेखित होतात. काळ आणि परिस्थिती बदलली आहे. आता कमी होत चाललेली लोकसंख्या चिंतेचे कारण होऊ पाहत आहे. या महत्वाच्या विषयावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात भाष्य केले. हिंदू समाजाची लोकसंख्या कमी होत आहे. ती टिकवण्यासाठी प्रत्येक कुटुंबात किमान तीन अपत्ये असावी, असे मत त्यांनी नोंदविले आहे.
नागपूर येथे कठाळे परिवारातर्फे कुळसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात बोलताना त्यांनी हा महत्वाचा विषय छेडला. त्यावर मार्मिक भाष्य केले. देशाच्या भविष्यासाठी योग्य लोकसंख्या वाढीचा दर राखणे महत्त्वाचे आहे असा दावा भागवत यांनी केला.
देशात हिंदूंची संख्या कमी होत आहे. हा चिंतेचा विषय आहे. लोकसंख्या शास्त्र सांगते की, लोकसंख्या वाढीचा दर 2.1 पेक्षा खाली गेल्यास तो समाज नष्ट होतो. आता पॉइंट एक माणूस तर जन्मत नाही. त्यामुळे दोन पेक्षा जास्त म्हणजे कमीत कमी तीन अपत्ये असावेत असे विधान त्यांनी केले.
संख्येची चिंता
कुटुंब समाजाचा घटक आहे. समाजात कसं राहायचं, हे माणूस कुटुंबातून शिकतो. लोकसंख्या कमी होत आहे. हा चिंतेचा विषय आहे. लोकसंख्या शास्त्र सांगते की, लोकसंख्या वाढीचा दर 2.1 पेक्षा खाली गेला, तर तो समाज नष्ट होतो. कोणी त्याला मारेलच असं नाही. तो समाज असाच नष्ट होतो. पृथ्वीच्या पाठीवर अनेक भाषा आणि समाज असेच नष्ट झाले आहेत. आपल्या देशाची लोकसंख्या नीती 2000 मध्ये ठरली. त्यातही सांगण्यात आले की, लोकसंख्या वाढीचा दर 2.1 पेक्षा खाली जायला नको.
मोहन भागवत यांनी व्यक्त केलेले विचार मोलाचे आहेत. चिंतन करण्यास बाध्य करणारे आहेत. यासंदर्भात दिसणारे वास्तव मात्र वेगळे आहे. त्यामुळे लोकसंख्या वाढ रोखण्यात कोणत्या बाबी कारणीभूत आहेत. याचाही सांगोपांग विचार होणे गरजेचे ठरते. वेगवेगळ्या समस्या आणि कारणे त्यामागे दडलेली आहेत. दाम्पत्याची मानसिकता, कौटुंबिक परिस्थिती, युवा पिढीत रुजलेले गैरसमज, आधुनिक विचारसरणीचा प्रभाव, याचाही साकल्याने विचार करण्याची गरज आहे.
मुलांची फौज
आपल्या दोन तीन पिढीच्या आधी ‘मुलं म्हणजे देवाघरची फुलं’हा विचार रुजवला गेला होता. किती मुलं व्हावी हे काय आपल्या हातात आहे. अशी बाळबोध विधाने ही ऐकायला मिळायची. कुटुंब नियोजनाचा फारसा प्रचार आणि प्रसार नव्हता. प्रत्येकाची मानसिकता वेगळी होती. नवीन काही स्वीकारणे सहज शक्य नव्हते. त्यामुळे घरं कसं गजबजलेलं असायचं. डझन अर्धा डझन मुलांची फौज बहुतेक घरी असायचीच.
काबाडकष्ट करून कुटुंब पोसणे ही तारेवरची कसरत अनेकजण लिलया पेलत होते. कोरडी चटनी भाकर हा दैनंदिन आहार असलेली मंडळी आपल्या घरी कुटुंबात सुखाने नांदत होती. जीवन जगताना काय टक्के टोणपे झेलावे लागतात. काय सोसावं आणि भोगावं लागतं हे या मंडळींना ठावूक होते. या व्यक्तींचे अनुभव जेव्हा बोलताना पाझरतात तेव्हा थक्क व्हायला होतं.
हम दो हमारा एक
काळासोबत परिस्थिती बदलली. नवीन आव्हाने समोर आली.प्रत्येकाने आपल्यात काळानुरूप बदल केले. कुटुंब आटोपशीर ठेवणे या बाबींकडे गांभीर्याने बघितले जाऊ लागले. सुरुवातीला ‘हम दो हमारे दो’ हा नारा काहिंनी कृतीत उतरवला. नंतर ‘हम दो हमारा एक’ हे बिरुद छोटेखानी कुटुंबाचा आदर्श ठरले. आता काही ठिकाणी ‘हम दो हमारा खुदका कुछ नहीं’ अशी परिस्थिती बघायला मिळते. परिस्थितीने वैतागलेल्या काहींनी मग दत्तक मुलं घेण्याचे व्यावहारिक पाऊल उचलले. आता तर दत्तक मुलं मिळणे ही लॉटरी लागण्यासाठी परिस्थिती आहे.
अनेक गर्भ श्रीमंत दत्तक मुलांसाठी आस लावून बसले आहेत. या बाबतची प्रक्रिया खूप कडक आणि तेवढीच किचकट देखील आहे. आता तर मुलांमुलींच्या लग्नाची समस्या मोठी बिकट झाली आहे. उच्चशिक्षित, भरपूर पगार, आर्थिक स्थैर्य, घरदार इस्टेट, गाडी बंगला हे सर्व काही असलेल्या मुलांनाही त्यांच्या अनुरुप जोडीदार मिळत नाही. बहुतेक मुलीही उच्चशिक्षित आणि नोकरी करणाऱ्या आहेत. त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मनसारखा जोडीदार मिळून लग्न ठरणे आणि ते टिकणे कठीण झाले आहे.
नसीब अपना अपना
ग्रामीण भागात परिस्थिती अधिक बिकट आहे. शेतकरी, कष्टकरी तसेच उद्योग व्यवसाय करणाऱ्या मुलांना लग्नासाठी मुलीचं येत नाहीत. हितसंबंधी आणि नातेवाईक यांच्यामार्फत होणारी लग्ने काय तो अपवाद ठरत आहेत. आता तुम्हीच सांगा मोहनजी या अडलेल्यांची केव्हा लग्ने होणार. केव्हा ती बापुडे तीन मुलांना जन्माला घालणार आणि विशेष म्हणजे त्यांचे सुयोग्य पालनपोषण कोण करणार प्रश्न मोठा बिकट आहे.
मुलामुली़ंची उशिरा लग्ने होत आहेत. एखाद्याला नशीबानं एखादे अपत्य झाले तरी तो ‘जश्न’ करण्याचा विषय ठरु पाहत आहे. काहींना खूप प्रतीक्षा करावी लागत आहे. वंध्यत्वाची समस्याही गंभीर आहे. धकाधकीच्या जीवनात गर्भपाताची कारणंही वाढली आहेत. यातून दाम्पत्याच्या मनावर व शरीरावर वाईट परिणाम होतात. बाळाच्या आशेपोटी काही धंदेवाईक डॉक्टर मंडळींकडून अशा अवस्थेतील जोडप्यांची आर्थिक लूट सुरू आहे. शाश्वती कुणाची नाही.
काही मुलींना मुलचं नको असते. आपल्या सुंदरपणावर परिणाम होईल, असा घट्ट गैरसमज त्यांनी करुन घेतला आहे. त्यामुळे आपल्या आवाहनानुसार जी हिंदुंची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करतील त्यांचे निश्चित स्वागत आहे. आपला विषय गंभीर आहे. मनन आणि चिंतन करायलाच हवे. ‘आखीर बच्चे भगवान का रुप होते है, मगर किसके नसिब में क्या लिखा है, यह कोई नहीं जानता’, बस यही ‘सच्चाई’ आहे. तीन मुले जन्माला घालणे सद्य:स्थितीत इतके सोपे नाही. ती अनेक समस्यांचा सामना करायला लावणारी अडथळ्यांची शर्यत आहे.