Mahayuti 2.0 : देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. मुख्यमंत्री पदाच्या त्यांच्या पहिल्या कार्यकाळात नागपूर, पुणे, मुंबईसह संपूर्ण राज्याचा विकास झाला. त्यामुळे ते पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, असे वाटत होते. मध्यंतरीच्या काळामध्ये प्रचंड संघर्ष त्यांनी केला. या संघर्षाचे आपण साक्षीदार आहोत. आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस चे मुख्यमंत्री होत असल्याने आनंद वाटत असल्याची प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी व्यक्त केली.
शपथविधी सोहळ्यापूर्वी अमृता फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. महायुतीच्या सरकारने महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शेतकरी आणि तरुणांसाठी देखील वेगवेगळ्या पद्धतीने योजना तयार करण्यात आल्या. या सगळ्यांचा फायदा महायुतीला विधानसभेच्या निवडणुकीत झाला आहे.
नरेंद्र मोदींवर विश्वास
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये देशाचा मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे. भारताचा महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा भारताने पुन्हा एकदा स्वीकार केला आहे. अशा परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असल्याने महाराष्ट्राच्या विकासाला दुहेरी बळ मिळेल. निवडणुकीपूर्वी जी वचनं महायुतीकडून देण्यात आली होती, त्यांची नक्कीच पूर्तता होणार असल्याचा विश्वास अमृता फडणवीस यांनी व्यक्त केला.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्याच्या विकासाचा आलेख उंचावला. महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री असतानाही त्यांनी महाराष्ट्राच्या भल्यासाठीच काम केले. त्याचे परिणाम आता सगळीकडे दिसत आहेत. लाडक्या बहिणींनी महायुतीला कौल दिला आहे. शेतकऱ्यांनी महायुतीला निवडले आहे. भाजप आणि महायुती महाराष्ट्रातील तरुणाईची पहिली पसंती ठरली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा सुवर्णकाळ आता सुरू झाल्याचे अमृता फडणवीस म्हणाल्या.
राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर मदत केली आहे. गेल्या अडीच वर्षांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रितपणे महाराष्ट्र मध्ये मोठे बदल घडवून आणले. जी जी कामं आतापर्यंत झाली नाही ही सर्व कामं आता होत आहेत. सबका साथ सबका विकास हा मंत्र नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. याच मंत्रावर देवेंद्र फडणवीस काम करीत असल्याचे अमृता फडणवीस यांनी नमूद केले. त्यामुळे लोकांच्या स्वप्नातील महाराष्ट्र आता घडेल. महायुती सरकारकडून हा महाराष्ट्र घडवला जाईल असेही अमृता फडणवीस यांनी ठामपणे नमूद केले. महायुती सरकारच्या पुढील वाटचालीला देखील त्यांनी शुभेच्छा दिल्या.